दौलतराव पिसाळ
वाई : महान्यूज लाईव्ह
गावातील यात्रेतील झेंडा बैलगाड्याचे चाक छातीवरून जाऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची भीषण घटना वाई तालुक्यातील कडेगाव येथील जानाईदेवीच्या यात्रेत घडली आहे.
झेंडा बैलगाड्याचे चाक सागर माधवराव मुरुमकर या तरुणाच्या छातीवरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने यात्रेवर शोककळा पसरली आहे .सागरच्या घरात आणी गावातील घराघरात यात्रे निमित्त आनंदाचे वातावरण असतानाच सागरच्या दुःखद निधनाची बातमी गावाच्या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासारखी पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे .
वाई तालुक्यातील कडेगाव या गावाचे ग्रामदैवत असलेल्या जानुबाई देवीची वार्षिक यात्रा एप्रिल महिन्यातील दि.२३ आणी २४ रोजी भरविण्याचे नियोजन ग्रामस्थांनी केले होते. त्याचा पारंपारिक पध्दतीने यात्रेचा मुख्य दिवस शनिवार दि. २३ हा आला होता. रुढी परंपरेनुसार देवीच्या मंदिरापासून तयार केलेला दगडी चाकांवर सुसर सारख्या आकाराचे लाकूड असते. त्या वर ऊंच असा खांब बसवलेला असतो त्याच्या ऊंचीवर मोठा झेंडा लावलेला असतो अशा पध्दतीने तयार केलेल्या या गाड्यावर अंदाजे २५ ते ३० भाविक ग्रामस्थ बसलेले असतात.
हा बलाढ्य गाडा बैलांच्या साह्याने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निघुन परंपरेनूसार गावाच्या शिवेपर्यत नेण्यात आला. शीवे पासुन पुन्हा गावाकडे हा गाडा परतत असताना तो रस्ता सोडून शेतात घालण्यात आला. त्या वेळी हा गाडा थोरवे यांच्या शेतात अडकल्याने तो बाहेर काढण्यासाठी बैलांनी हिसका दिल्याने गाड्याने झोला खाल्ला. त्यावेळी गाड्याच्या ऊंचीवर बसलेले सागर माधवराव मुरुमकर हे खाली कोसळले. गाड्याभोवती नागरिकांची गर्दीअसल्याने काही समजण्याआधीच त्यांच्या छातीवरुन दगडी चाक गेल्याने सागरचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण दुर्घटनेची माहिती कडेगावचे पोलिस पाटील अक्षय टिके यांनी तातडीने वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मोबाईल वरुन कळविली .भरणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ हवलदार शिवाजी वायदंडे, रामदास पवार, एच.एस.शिंदे आणी गहीत यांना तातडीने घटना स्थळावर जाण्याचे आदेश दिले . तो पर्यंत मयत सागर माधवराव मुरुमकर (वय ३८ ) यास गावकर्यांनी वाईच्या खाजगी रुग्णालयात आणले असता तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत .
सागरच्या मागे पत्नी आणि ८ वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या अशा अचानक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.