महान्यूज लाईव्ह विशेष
भारत महासत्ता होणार असल्याचे भविष्य गेले कित्येक वर्षे आपण नेहमी ऐकत असतो. पण आता जागतिक स्तरावरील तज्ञदेखील भारत हा भविष्यातील महासत्ता असेल असे भाकित वर्तवू लागल्या आहेत. भारतीय उद्योजक गौतम अदाणी यांनीही दोन दिवसांपूर्वी याच विषयावर भाष्य केले होते.
वर्ल्ड इन २०५० हा जागतिक स्तरावरील आर्थिक तज्ञांनी एकत्र येऊन तयार केलेला अहवाल आहे. २०५० मध्ये जग कसे असेल याचे भाकित त्यांनी या अहवालात वर्तवले आहे. ज्यांना या विषयात अधिक रस असेल त्यांच्यासाठी हा अहवाल इंटरनेटवर उपलब्ध आहे. या अहवालातील भारताच्या संदर्भातील आशादायक चित्र त्यांनी मांडले आहे.
लोकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेनूसार या अहवालानूसार २०१६ मध्येच भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोचला आहे. पहिल्या नंबरवर चीन व दुसऱ्या नंबरवर अमेरिका आहे. मात्र २०५० मध्ये भारत अमेरिकेला मागे टाकून २ नंबरवर जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
या अहवालानूसार २०५० मध्ये जागतिक उत्पन्नामध्ये भारताचा वाटा १५ टक्क्यांपर्यंत पोचेल, जो आज ७ टक्के आहे. चीन १८ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर,तर अमेरिका १६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर येईल.
या अहवालानूसार जगाची विभागणी दोन प्रकारे करण्यात आली आहे. यामध्ये विकसित अर्थव्यवस्था असलेले देश आणि विकसनशील अर्थव्यवस्था असलेले देश अशी विभागणी आहे. यामध्ये विकसनशील देश २०५० पर्यंत विकसित देशांना मागे टाकतील आणि जगाची आजची सगळी रचनाच बदलून जाईल अस म्हणले आहे. विकसीत देशांमध्ये फ्रान्स, कॅनडा, जर्मनी , इटली जपान, इंग्लंड आणि अमेरिका तर विकसनशील देशामध्ये ब्राझील, चीन, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, रशिया आणि तुर्कस्थान या देशांचा समावेश करण्यात आला आहे.
भारताची ताकद ही त्याच्या तरुण लोकसंख्येत असल्याचे म्हणले आहे. जर भारत या तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण देऊ शकला, त्यांच्या हाताला काम देऊ शकला तरच हे स्वप्न साकार होऊ शकते. अर्थव्यवस्थेच्या वाढीमधील अडथळे दुर करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, देशात उद्योगवाढीसाठी अनुकुल वातावरण ठेवले पाहिजे, सरकारी यंत्रणांमध्येही आवश्यक ते बदल केले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी केल्या तरच भारत जगामध्ये आपली जागा मिळवू शकेल असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.