डॉ. महेश घोळवे
महान्यूज लाईव्ह विशेष
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला गुणवत्ता टिकवावी लागते. एकीकडे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रमाण वाढत असतानाच त्या स्पर्धेत टिकून राहण्याचं जिल्हा परिषद शाळांना मोठं आव्हानच आहे. त्यामुळेच शासन सुद्धा शिक्षक भरती करताना टीईटी नावाची चाळन लावूनच शिक्षक भरती करत आहे, आणि त्यातून उत्तोमत्तम शिक्षक हे जिल्हा परिषद शाळांना लाभत आहेत.
निंबोडी येथील घोळवेवस्ती शाळेमध्ये शिक्षक विठ्ठल जोरी व सचिन दराडे यांनी आपल्या कर्तृत्वाची व कौशल्याची छाप पाडत जिल्हा परिषद शाळेत अनेक मुलांना प्रवेश घेण्यास आकर्षित केले. अगदी सुट्टी दिवशीही शिक्षणाचा यज्ञ सुरू ठेवल्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांचा ओढा प्रचंड वाढला. पालक देखील मुलांच्या गुणवत्तेत कमालीची सुधारणा झाल्याने समाधान वाटत होते. यावर्षीचा शाळेचा प्रवेश देखील खूप उत्साहात पार पाडला. इंग्रजी माध्यमातून दाखले काढून या मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढलं आहे.
आज सकाळी मुलांची प्रभात फेरी काढून नवीन प्रवेशित मुलांना अनोख्या पद्धतीने शाळेत प्रवेश दिला. ढोल ताशा लेझीम वाजवत व हातात गुलाबाचे फुल देत वर्गात येणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरच हास्य काही वेगळेच होते. महात्मा फुले, जिजामाता, सावरकर, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी अशा वेशभूषा मुलांनी परिधान करून ही मुलं नवीन मुलांना शाळेविषयी माहिती सांगत होते व शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होते.