शेखर हुलगे
महान्यूज लाईव्ह विशेष
२३ एप्रिल हा इंग्रजी भाषा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी जगप्रसिद्ध ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपियर ( १५६४-१६१६ ) यांचा जन्मदिन तसेच मृत्युदिन मानला जात असल्याने या दिवसाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेक्सपियरच्या काळापूर्वी लिखित इंग्रजी एकंदरीत प्रमाणित नव्हते. व्याकरण , शब्दलेखन आणि शब्दसंग्रह मानकीकरणात त्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शेक्सपीयरने जवळपास सतराशेहून अधिक मूळ शब्द इंग्रजी भाषेला बहाल केले आहेत, त्यापैकी बरेच शब्द आपण अजूनही वापरतो.
संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या (UN) जागतिक संप्रेषण विभागाने पहिल्यांदा २३ एप्रिल २०१० रोजी इंग्रजी भाषा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवसाचा मुख्य उद्देश बहुभाषिकता आणि सांस्कृतिक विविधता वाढीसाठी विविध भाषांचा वापर करणे हा आहे.
सध्या जगभरात १.७५ अब्जाहून अधिक लोक इंग्रजी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात करतात, तसेच ६७ हून अधिक देशांमध्ये इंग्रजी भाषा ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली गेली आहे. त्यामुळे इंग्रजी ही जगभरातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा बनली आहे.