राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील नायगाव, राजेगाव परिसरातील उजनी व वन संपादित क्षेत्रातात सुरू असलेल्या बेकायदा माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वनविभागाने त्यांच्या हद्दीत कारवाई केली होती. मात्र अवघ्या पंधरा दिवसांतच पुन्हा मातीचे जेसीबी मशीनच्या सहाय्याने बेकायदा उत्खनन व वाहतूक सुरुच आहे. राजेगाव व नायगाव या भागातील काही स्थानिक राजकीय मंडळींनी स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही बेसुमार माती चोरीचा दिवसरात्र जात सपाटा लावला आहे. राजकीय दबावामुळे संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या भीमा नदीची पाणी पातळी जशी घटली आहे तशी या भागातून मातीची चोरी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. मागील काही दिवसांपुर्वी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या रस्त्यावरून वाहतूक करीत असलेल्या एका माती वाहतुकीचा ट्रक पकडुन कारवाई केली होती. रोज दहा बारा ट्रक मधुन याठिकाणी मातीची खुलेआम चोरी केली जात आहे. ही माती भिगवण व परिसरातील विटभट्टी व्यवसायिकांना विकली जात आहे. परिणामी प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच शासकीय भूखंडाचेही मोठे नुकसान होत आहे. संबंधित अधिकारी यांनी येथील उत्खनन केलेल्या क्षेत्राचे पंचनामे करून संबंधित व्यक्तीवर ठोस कारवाई करुन माती उत्खनन व वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र शासकीय यंत्रणा ठोस कारवाई करीत नसल्याने नागरीक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.