शिरूर : महान्युज लाइव्ह
मांडवगण फराटा ( ता.शिरूर ) येथील प्रगतशील शेतकरी अक्षय दादा पाटील फराटे यांनी पाच एकरात खरबूज पिकाचे १२५ टन उत्पन्न घेतले आहे. उच्च शिक्षित असूनही शेतीला नाविन्याने जोड देत शेतीत रबिविलेले उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात सर्वात जास्त तरकारी पिके घेतली जातात. त्याचबरोबर फळपिकेही घेतली जातात. मांडवगण फराटा येथील अक्षय दादा पाटील फराटे यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीत लक्ष देण्याचे ठरवले. त्यानुसार पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिकता आणण्याचे ठरवले. भीमा नदीचे पाणी व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतातच सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत यंत्रांच्या साहाय्याने ” शेतीला गरज तेवढे पाणी ” अशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा राबविले. या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण शेतीला वेळेनुसार व गरजेनुसार खते व पाणी देता येते.
खरबूज पिकाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, पाच एकरात ३४ हजार खरबूज रोपांची लागवड जानेवारी महिन्यात दोन टप्प्यात केली होती. तत्पूर्वी शेताची मशागत करून बेड उभारणी करून शेणखत, कोंबडीखत, बेसलडोस,रासायनिक खते देण्यात आली. लागवड करण्यासाठी संपूर्ण ठिबक सिंचन, मल्चींग पेपरचा अवलंब करण्यात आला. दोन दिवस बेडला पाणी देण्यात आले. लागवडी योग्य झाल्यानंतर ठराविक अंतराने रोपांची लागवड करण्यात आली. लागवड पूर्ण झाल्यानंतर आठवड्यातून दोन वेळा आळवणी देण्यात आली. उन्हापासून संरक्षण व रोगराई पासून संरक्षण मिळावे यासाठी २१ दिवस रोपांवर आच्छादन करण्यात आले. लागवडीनंतर सातत्याने रोगराई होऊ नये यासाठी महिन्यातून तीन ते चार वेळा औषध फवारणी करण्यात आली. साठ दिवसानंतर फळांची पूर्ण वाढ झाल्यानंतर एक फळ दीड ते अडीच किलोपर्यंत झाले असल्याचे फराटे सांगतात. ही फळे मुंबई वाशी मार्केट येथे स्वतः विक्रीसाठी पाठवली जात असून २५ ते ३० रुपये प्रमाणे बाजारभाव मिळत आहे.
याबाबत बोलताना अक्षय फराटे यांनी सांगितले की, शेतीत आधुनिकता आणल्याने खर्चाची व पाण्याची बचत होत असून उत्पन्न देखील वाढत असून शेतकऱ्यांनी शेतीत नावीन्य आणले तर निश्चित प्रगती साधता येते असे त्यांनी सांगितले.