मुंबई : महान्यूज लाईव्ह
सत्तेचा माज काहीही करु शकतो. आपली मुलगी शाळेत पहिली यावी यासाठी एका सत्ताधारी नेत्याने तिच्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थिनीला शाळेतून काढायला लावल्याचा प्रकार आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये घडलेला आहे. दहावीत शिकत असलेल्या या हुशार विद्यार्थिनीने आत्महत्या केली. यावेळी तिने आईवडिलांच्या नावाने लिहलेल्या चिठ्ठीतून हा सगळा प्रकार उघड झाला आहे.
मिस्बाह फातिमा हे या मुलीचे नाव आहे. तिचे वडील चित्तूरच्या पालमनेरमध्ये सोडा विकून उदरनिर्वाह करतात. मिस्बाहने आपल्या चिठ्ठीत म्हणले आहे की, माझ्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळा प्रशासनावर दबाव आणून मला काढून टाकले. त्यांची मुलगी पहिली यावी यासाठी त्यांनी हे केले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी कोणतेही कारण न देता मला शाळेतून काढून टाकल्याचे मिस्बाहने या चिठ्ठीत म्हणले आहे.
पोलीस याप्रकरणी अत्यंत धीम्या गतीने तपास करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी वायएसआर कॉंग्रेसचे नेते सुनील यांना विरोधक जबाबदार धरत आहेत.
मिस्बाहला धमक्या दिल्या जात होत्या. खुद्द मुख्याध्यापकच तिला धमकावत होते. त्यामुळेच मिस्बाहने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.