अनिल माने, इंदापूर
शुक्रवार हा आमच्या गावातील आठवडे बाजाराचा दिवस ! आम्ही चौथीला शाळेत असेल, त्यावेळी दर बाजारी घरुन एक दीड रुपये मिळायचे. संपूर्ण बाजार पालथा घातल्यानंतर शेवटी भेळीच्या दुकानावर ते पैसे संपायचे. भेळ खाऊन झाल्यावर उरलेल्या कागदावरच्या बातम्या वाचायची सवय लागली. अवांतर वाचनाचे हे पहिले पाऊल होते.
बाजारातच कळसाईत बुक डेपो नावाचे एक स्टेशनरी दुकान लागायचे. त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्याबरोबरच चांदोबाचे जुने अंक निम्म्या किंमतीत विकायला असायचे. नकळत जिभेला लगाम घातला आणि मेंदूला खुराक पुरवायला सुरुवात झाली.
गावच्या वाचनालयात जाऊन पेपर वाचायची सवय लागली. दर रविवारी येणारी पुढारीची बहार पुरवणी, सकाळची सप्तरंग पुरवणी आवर्जून वाचायला लागलो.
दहावीत असताना मराठा सेवा संघाचे मुखपत्र “मराठमार्ग”च्या एका अंकातील “चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील ८० चुका” नावाचा लेख वाचनात आला. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ऐतिहासिक, सामाजिक विषयांवरील वाचनाकडे वळलो.
बारावीच्या परीक्षांनंतर शिखर शिंगणापूरच्या यात्रेला गेलो असताना तत्कालीन मराठा सेवा संघ इंदापूर तालुकाध्यक्ष दिलीपजी पालवे यांनी परिवर्तनवादी पुस्तकांचा एक स्टॉल लावला होता. तिथे प्रा.मा.म.देशमुख यांचे “बहुजन समाज आणि परिवर्तन” हे पुस्तक घेतले. सामाजिक चळवळींमधील काही संकल्पना पहिल्यांदाच समजत होत्या.
“ज्याच्या घरात नाही पुस्तकांचे कपाट, ते घर केव्हाही होऊ शकते भुईसपाट” हा मा.म.देशमुख सरांचा विचार पटला आणि त्यांना फोन करुन मनिऑर्डरद्वारे “मध्ययुगीन भारताचा इतिहास, रामदास आणि पेशवाई, मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा” अशी अजून पुस्तके मागवून घेतली.
२००७ साली पुण्यात मराठा सेवा संघाचे बारावे राष्ट्रीय अधिवेशन होते. पुण्याला पहिल्यांदा येण्याचं निमित्त झाला तो हा कार्यक्रम ! तिथल्या पुस्तकांच्या स्टॉलवरुन अनेक पुस्तके आणली.
“पुस्तकाने माणसाचे मस्तक सशक्त होत असते. असे सशक्त झालेले मस्तक कुणाचे हस्तक होत नसते. कुणाचेही हस्तक न झालेले मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नसते…”
हा विचार मराठा सेवा संघाने रुजवला. मराठा सेवा संघाने माझ्यासारख्या असंख्य तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत. स्वतः पुस्तक विकत घेऊन वाचायची सवय लागली. पेपरमधील कात्रणे काढायची सवय लागली. मग जिथे कुठे कार्यक्रमाच्या ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल असतील तिथुन पुस्तके आणून वाचू लागलो. लोकांना वाचायला देऊ लागलो. थेंबे थेंबे तळे साचवत गेलो आणि आज घरी स्वतःची छोटीशी लायब्ररी आहे.
अर्थातच सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून वाचनाची सवय मोडली आहे. अनेकदा ठरवूनही पुस्तक वाचणं होत नाही. पण वाचनामुळे मिळालेली लिखाणाची प्रेरणा आजही तशीच शाबूत आहे. जितकं काही तोडकंमोडकं लिखाण जमतंय त्यामागची प्रेरणा म्हणजे हा सगळा वाचन प्रवासच आहे.
चांगली पुस्तके माणसाचं आयुष्य बदलून टाकतात असं म्हटलं जातं. आजपर्यंत जितकी पुस्तकं वाचली ती चांगलीच होती. इथून पुढेही चांगलीच पुस्तके वाचण्याचा संकल्प आहे. यानिमित्ताने पुस्तकांबाबत वाचलेल्या छान ओळी आठवत आहेत,
“वाचणं ही पेरणी आहे आणि लिहणं हे उगवणं
उगवण्याची चिंता करु नका, पेरणीला सुरुवात करा.
एक दिवस तुमच्या पेरणीनं उगवलेलंच,
लोक त्यांच्या पेरणीसाठी घेऊन जातील…” सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !