घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
कोणे ऐके काळी संगीत नाटक कंपन्या हे महाराष्ट्राचे वैभव होते. या नाटक कंपन्यांचे महाराष्ट्रभर दौरे चालत. या नाटकांच्या प्रयोगांच्या चर्चा साऱ्या राज्यात चालत. त्यातील पदे सर्वसामान्याच्या तोंडी असत. चित्रपटांचे युग सुरु झाले आणि या संगीत नाटक कंपन्यांचे वैभव लयाला गेले. कोरोनामुळे चित्रपट आणि नाट्यगृहे बंद पडली होती, ती आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी सज्ज झाली आहेत. परंतू या चित्रपट आणि नाट्यगृहात काय करमणूक होईल, त्यापेक्षा हजारो पटीने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची करमणूक करण्यासाठी राजकीय नाटक कंपन्यांनी आता कंबर कसली आहे. या नाटक कंपन्यांच्या प्रयोगांचे नाट्यपरीक्षण येथे करण्याचा विचार आहे. हे परीक्षण वाचून कोणत्या नाटक कंपनीच्या प्रयोगाकडे लक्ष द्यायचे हे समजायला कदाचित जनतेला मदत होईल.
पहिला पाहू आज उद्या होणार असणारा अगदी ताजा प्रयोग. रवी आणि नवनीत राणा आणी कंपनी यांचा ‘ हनुमान चालिसा ‘ नाट्यप्रयोग. या नाटकाचा पहिला प्रयोग अमरावती येथे पार पडला. दुसऱ्या प्रयोगासाठी ही कंपनी आता मुंबई येथे पोचली असून उद्या सकाळी या नाटकाचा दुसरा प्रयोग मातोश्रीसमोर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा दुसरा प्रयोग करण्यापूर्वीच राणा कंपनीला ऐवढा फायदा झाला आहे की आता प्रयोग झाला किंवा नाही झाला तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही.
दुसरी राजसाहेबांची एकपात्री नाटक कंपनी. गेले काही दिवस या नाटक कंपनीने ‘ भोंगा ‘ या नाटकाचे दौरे सुरु केले आहेत. पहिला प्रयोग मुंबईत, दुसरा प्रयोग ठाण्यात झाला. आता तिसरा प्रयोग ३ मे रोजी औरंगाबाद येथे होणार आहे.
पुर्वीच्या नाटककंपन्यांमध्येही स्पर्धा होती, तशी या नाटककंपन्यांमध्येही आहे. त्यामुळे मुंबईतील राणा कंपनीचा प्रयोग होऊ नये यासाठी तिथली नाटककंपनी जीवाचे रान करते आहे. मुंबईच्या या नाटककंपनीला राणा कंपनीच्या या प्रयोगाचा उपयोग आपल्या आगामी ‘ महापालिका ‘ या नाट्यप्रयोगाच्या तालमीसाठी करून घ्यायचा आहे असे बोलले जाते आहे. औरंगाबादचा राजसाहेबांचा प्रयोग होऊ नये यासाठीही स्पर्धकांचे प्रयत्न सुरु आहेत.
आणखी एक अचानक प्रयोग दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी नाटक कंपनीच्या दौऱ्यात झाला. या दौऱ्यात एका कलाकाराने अचानकपणे अॅडिशन घेतली. पुरोहिताच्या नकलेवर आधारील ‘ मम भार्या समर्पणाय ‘ ही अॅडिशन आता इतकी लोकप्रिय झाली आहे की, या नावाचा स्वतंत्र नाट्यप्रयोग काही दिवसात महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. नाटक कंपन्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी या कंपनीलाही एका ताज्या दमाच्या तगडया कलावंताची उणीव भासत होती. सांगलीच्या दौऱ्यात हे ‘ अमोल ‘ रत्न त्यांना सापडल्याचे दिसते आहे.
याखेरीज फडणवीस आणि पार्टीचा मुंबई दौरा सध्या सुरु आहे. नाटक कंपनीच्या गाडीवर दगडफेक हीदेखील जुन्या संगीत नाटक कंपन्यांच्या काळातील नेहमीची घटना होती. येथे या नाटक कंपनीच्या वाहनावरही दगडफेक झाली आहे. असल्या दगडफेकीचे नाट्यप्रयोगात रुपांतर करण्यात फडणवीस आणि पार्टीचा हातखंडा आहे. त्यामुळ गेले दोन दिवस तोही नाट्यप्रयोग चांगलाच रंगतो आहे.
गुणरत्न सदावर्ते हा हाडाचा कलावंत गेले काही महिने प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. पण पुढील काही काळ तरी त्याची नाटके बंद राहतील अशी अपेक्षा आहे.
डास ज्यावेळी घराबाहेर पडतो, त्यावेळी आपल्या बायकोला सांगतो की मी आल्याशिवाय भात शिजायला टाकू नकोस. कोण जाणे कोणत्या माणसाची टाळी वाजेल, आणि त्यात मी सापडेल. हे झाले डासांचे. माणसे मात्र अशा नाटक कंपन्यांच्या प्रयोगाला जाऊन स्वत:च टाळ्या वाजवतात आणि त्याच टाळ्यांमध्ये सापडून स्वत:च मरतात.
आता या सगळ्या नाटक कंपन्यांचे काय करायचे हे महाराष्ट्रातील जनतेच्या हातात आहे. शेवटी तुमच्या उदंड प्रतिसादावरच या नाटक कंपन्याचा धंदा जोरात सुरु आहे.