दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : भुईंज येथील उद्योजक ओंकार कैलास चव्हाण
याचे ४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी कुख्यात गुंड बंटी जाधवसह तब्बल १२ जणांनी अपहरण करून निर्जन स्थळी नेऊन त्याला अमानुष मारहाण केली व त्याचा खून केला होता. एवढ्यावर न थांबता पोलिसांना सुगावा लागू नये आणि पुरावा मिळू नये म्हणून या टोळीने भुईंज येथील स्मशानभूमीत ओंकारचा मृतदेह आणून त्याच रात्री जाळून त्याची राख लगतच कृष्णा नदीत टाकली होती.
या प्रकारामधील १० आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिष कांबळे व त्यांच्या पथकाने या आधीच गजाआड करुन सर्व आरोपींना मोका लावला आहे.
मात्र यातील आरोपी काश्या कचरे आणि मिथुन घाडगे हे दोन्ही भुईंज पोलिसांना सापडत नव्हते. २१ एप्रिल रोजी काश्या कचरे हा रात्री भुईंज परिसरात येणार असल्याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांना समजताच त्यांनी त्या परिसरात आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सापळा लावला आणि मध्यरात्री काश्या कचरेला पकडले.