सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या गोतोंडी विविध सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटीवर तब्बल दहा वर्षे अधिराज्य गाजवणा-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव करून भाजपप्रणीत गौतमेश्वर विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर म्हणजेच १३ – १ असा विजय मिळवीत यश संपादन केले आहे.
गोतोंडी सोसायटीची निवडणूक यावेळी अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. मात्र सोसायटीच्या सभासदांनी सत्ताधाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवत पराभवाची धूळ चारली व सभासद मतदारांनी भाजपला भरभरून कौल देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हाती भोपळा देत परिवर्तन घडविले.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावपातळीवरील विकासामध्ये विविध कार्यकारी सोसायटी यांचे स्थान मोठे असून विजयी सदस्यांनी विकासात्मक कार्याला महत्त्व द्यावे असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
गोतोंडी गावच्या पंचक्रोशीमध्ये सोसायटीच्या निवडणुकीची चर्चा झडत असताना मतदारांनी या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना नाकारल्याची चर्चा काल दिवसभर इंदापूर तालुक्यात रंगलेली दिसून आली.