इंदापूर : महान्यूज लाईव्ह
एकमेकांवर जीवघेणे हल्ले करणारे फ्री रेसलिंगच्या रिंगमधील पहेलवान पहायला अनेकांना खुप आवडतात. या फ्रि रेसलिंगमधला देव म्हणजे ‘ दी ग्रेट खली ‘. इंदापूर तालुक्यातील पळसदेवजवळील काळेवाडी नं. २ मधील एक युवकही आता या ग्रेट खलीच्या पायावर पाऊल टाकतोय. १६ मार्चला झालेल्या एका लढतीत या पोराने रक्तबंबाळ अवस्थेतही प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवलाय, आणि ग्रेट खलीच्या हातून अतीशय सन्मानाचा बेल्ट मिळवला आहे.
फकीर भंडारी हे या युवकाचे नाव. त्याचे मुळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरलेगाव. पण घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याचे आईवडील इंदापूर तालुक्यातील पळसदेवजवळील काळेवाडी नं. २ येथे मासेमारी व्यवसाय करतात. फकीरने नेहमीची चाकोरी सोडून वेगळाच रस्ता निवडला. गेल्या दोन वर्षापासून तो द ग्रेट खली यांच्या अॅकॅडमीमध्ये सराव करीत आहे.
१६ मार्चच्या सी डब्ल्यू रेसमध्ये त्याची जितू चौधरी याच्याशी फाईट होती. या फाईटमध्ये चौधरीने फकीरच्या डोक्यावर खुर्ची मारली. रक्तबंबाळ झालेल्या फकीरने त्याच अवस्थेत तीच खुर्ची चौधरीच्या डोक्यात मारली. त्यानंतर चौधरी उठूच शकला नाही.
यानंतर फकीर भंडारीला विजयी घोषित करण्यात आले. ‘ लुश ‘ चा ३० ते ३५ लाख किंमतीचा बेल्ट त्याला देण्यात आला. द ग्रेट खली यांनीही त्याचे अभिनंदन केले.