मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा – मुंडे यांनी सगळ्या महाराष्ट्रात फिरून धनंजय मुंडे यांच्यावर विविध आरोपांचे सत्र सुरु ठेवले आहे. आता आणखी एक महिलेने धनंजय मुंडे यांना बदनामी करण्याची धमकी देऊन पाच कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे एक नवे प्रकरण पुढे येत आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात या महिलेने आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून पाच कोटी रुपये आणि महागड्या मोबाईल फोनची मागणी केली होती. संबंधित महिला ही धनंजय मुंडेंच्या परिचयाची आहे, असे त्यांनी पोलीसात केलेल्या तक्रारीत म्हणले आहे. मुंडे यांनी या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि मोबाईल फोनही पाठवला होता. परंतू ही महिला पाच कोटी रुपये पाहिजेत म्हणून धमक्या देत राहिली. अखेर मुंडे यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवले असून आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे हद्यविकारामुळे रुग्णालयात होते, ते नुकतेच रुग्णालयातून बाहेर आले आहेत.
धनंजय मुंडे यांची परिचयाची ही महिला आहे तरी कोण याबाबत आता माध्यमांमध्ये उत्सुकता आहे.