मुंबई : महान्यूज लाईव्ह
नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांना सतत आपला जीव जोखीमीत टाकावा लागतो. अशा वेळेस नागरिकांच्या रक्षणासाठी आपला जीव अर्पण करणाऱ्या पोलीसांच्या कुटुंबियांना १ कोटीची मदत देण्याचा निर्णय पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने घेतला आहे.
पठाणकोट येथील तिरंगा यात्रेत अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेला हे वचन दिले होते. आता सरकार स्थापनेनंतर केजरीवाल यांनी हे आश्वासन पूर्ण केले आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने यापूर्वीच हा निर्णय घेतला आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही याबाबतची घोषणा केली आहे.
यासोबतच पोलिस कल्याण निधीही १० कोटींवरून १५ कोटी करण्यात आल्याची घोषणा भगवंत मान यांनी केली आहे.
ही घोषणा करताना केलेल्या भाषणात पोलिसांच्या कामात सरकार हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली आहे.