घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
ख्रिश्चन धर्माचा मुख्य आधार म्हणजे जागोजागी उभे असलेले चर्च. सश्रद्ध ख्रिश्चनांच्या सगळ्या प्रथा परंपराचे जतन आणि नियमन करणाऱ्या या चर्चेसमध्ये सध्या मोठ्या गोंधळाचे वातावरण आहे. ख्रिश्ननधर्मिय असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धात कुणाच्या बाजूने उभे रहावे याचा निर्णय या चर्चेसला करता येत नाहीये, त्यामुळेच मोठी अनावस्था स्थिती उत्पन्न झाली आहे.
रशियाची राजधानी मास्को येथील चर्च रशियाच्या बाजूने उभे राहिले आहे. तेथील धार्मिक पुरोहित रशियन सैनिकांना आर्शिवाद देत आहे, कुमारी माता मेरीचे सोनेरी निशाण रशियन सैन्याधिकाऱ्यांच्या हातात सोपवत आहेत. त्यानी हे एक ‘ पवित्र ‘ युध्द असल्याचे जाहिर करून टाकले आहे.
त्यांच्या या पावित्र्याने रशियाबाहेरील ख्रिश्चन जगात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषत: युक्रेनियन चर्चममधील धार्मिक अधिकाऱ्यांची मोठी कोंडी होत आहे. दररोज युक्रेनमधील महिला, लहान मुले, वृद्ध आणि तरुणांचा जीव घेणाऱ्या रशियाला असा आशिर्वाद दिला जात असल्याने त्यांच्यात मोठी अस्वस्थता आहे. खरेतर मास्को येथील चर्चला ख्रिश्चन जगात प्रचंड मान्यता आहे. युक्रेन रशियापासून स्वतंत्र झाल्यानंतर रशियन चर्चने युक्रेनमधील चर्चला स्वातंत्र्य बहाल केले होते . परंतू त्यानंतरदेखील निम्म्याहून जास्त युक्रेनियन चर्चेसने मास्को येथील चर्चसोबतच राहणे पसंत केले होते. मात्र आता या युद्धाने परिस्थिती बदलली आहे. आता मास्कोच्या चर्चशी असलेल्या संबंधांचा उल्लेख करणे टाळले जात आहे.
मास्को येथील चर्चशी संलग्न असणारी चर्चेस केवळ युक्रेनमध्येच नाहीत, तर सगळ्या युरोपभर आणि अमेरिकेतही आहेत. या चर्चेसची आता चांगलीच कोंडी होते आहे. युक्रेन वगळता इतर देशातील चर्चमधील धार्मिक पुरोहितांनी आजवर यावर स्पष्ट शब्दात बोलण्याचे टाळले आहे. याचे मुख्य कारण या चर्चेसला मिळणारा पैसा हे आहे. रशियाचे अध्यक्ष पुनीत यांनी स्वत:ची धार्मिक प्रतिमा तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांनी केवळ रशियाच नाही तर सगळ्या जगभरातील चर्चेसना पैसा पुरविण्यात स्वारस्य दाखवले आहे. आता याच आर्थिक आधारावर उभी असलेली ही चर्चेस युक्रेनमध्ये रशियन आक्रमणामुळे झालेल्या नरसंहाराविरोधात एक शब्दही बोलण्यास कचरत आहेत. त्यांना रशियाला आक्रमणकारी म्हणणे जड जाते आहे.
मात्र यापासून लांब असणारे सश्रद्ध ख्रिश्चन मात्र ठामपणे याबाबतीत बोलताना दिसत आहे. ख्रिश्चन धर्मसंस्थेने रशियाच्या या आक्रमणाला विरोध करावा अशी मागणी आता त्यांच्याकडून होत आहे. रशियन चर्चच्या प्रभावाखाली असणाऱ्या चर्चेसमध्ये जाणे अनेकांनी बंद केले आहे. मास्को चर्चशी संबंध तोडण्याचा दबाव चर्चेसवर वाढत आहे. याउलट मास्को चर्चच्या संलग्ननेत नसणाऱ्या चर्चेमधील धार्मिक अधिकारी स्पष्टपणे या युद्धाचा विरोध करत आहेत. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या या धर्मसंस्थेत दुफळी माजण्याची शक्यता बळावली आहे.
ख्रिस्ती धर्म हा एकेश्वरी म्हणजे एकाच देवावर श्रद्धा ठेवणारा धर्म आहे. त्या एका देवावर विश्वास ठेवणाऱ्या या धर्माचे ठेकेदार आपल्या निष्ठा सत्ता आणि पैशापुढे वाहून बसलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांना रोखठोक भुमिका घेणे जड जात आहे.
देव आणि माणुस यामधील मध्यस्थ म्हणजे पुरोहित अर्थात ‘ ब्राम्हण ‘.
या ब्राम्हणांचे म्हणजेच पुरोहितांचे वर्तन जगभर सगळीकडे सारखेच असते. सर्वसामान्यांना धर्माचा दंडुका दाखवणारे हे पुरोहित सत्ता आणि पैशापुढे इतके नतमस्तक होतात की, त्यावेळी त्यांना आपल्या देवाचीही आठवण उरत नाही. यामुळेच देवाच्या नावाखाली एकत्र आलेल्यांना माणुसकीवर हल्ला होताना दिसत असतानाही एक भुमिका शक्य होताना दिसत नाही
हिंदू ‘ ब्राम्हण ‘ मुस्लिम ‘ मुल्ला, मौलवी ‘ असो किंवा ख्रिश्नन ‘ पोप, बिशप, पाद्री ‘ सगळ्या धर्मांच्या पुरोहितांबाबत इतिहासाची हीच साक्ष राहिली आहे.