दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील २३ जणांच्या टोळक्याने दौंड काष्टी रोडवर सुरू असलेली भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून पोलीस शिपाई आणि त्याच्या मित्रांवर लाकडाने, हाताबुक्काने मारहाण करीत जीवघेणा हल्ला केल्याची घटना दौंड पाटस रोडवर पाटस येथे घडली. याप्रकरणी २३ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
दरम्यान, पाटस दौंड रस्त्यावर २३ जणांचे टोळक्याचे रस्त्यावर जोरदार फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. यादरम्यान माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव आणि युवा नेते गणेश थोरात, दिलीप हंडाळ हे दौंडकडे जात असताना पाटस येथील जुने पाटबंधारे विभागाचे कार्यालय समोर हा प्रकार सुरू असल्याचे दिसले. गणेश थोरात यांनी गाडी बाजूला घेत ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र थोरात यांना पहाताच ह्या टोळक्याने तेथुन पळ काढला. थोरात यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला आणि पुढील मोठा अनर्थ टळला!
या प्रकरणी विजय क्षत्रीय, जॉकी पानसरे , बिटटु पानसरे ( पुर्ण नाव माहित नाही. सर्व रा. पाटस ता.दौंड जि.पुणे व २० अनोळखी व्यक्ती, नाव पत्ता माहीत नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ( दि.१९ ) सायंकाळी सात सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड काष्टी रोडवरील भीमा नदीच्या पुलावर दोन व्यक्ती एका वाहनचालकाला मारहाण करीत होते. या दरम्यान हिंजवडी येथील पोलीस स्टेशला काम करणारे पोलीस शिपाई दत्तात्रय उत्तम शिंदे, नितीन जमदाडे आणि मित्र हे पुण्याला जात असताना त्यांना हा प्रकार दिसल्याने त्यांनी का मारता, मारु नका असे सांगत त्यांची समजूत काढत भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनी तेथे त्यांना अरेरावी करीत बघुन घेतो अशी धमकी देत त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. पाटस जवळ जुने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर या दोघांनी गाडी आडवी मारुन शिंदे यांची गाडी अडवली. त्यावेळी त्याठिकाणी २१ जणांचे टोळके अगोदरच उभे होते. त्यांनी शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथाबुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून स्वीफ्ट कारवर दगड फेकुन मारुन मोडतोड केली. बिटु पानसरे हातात मोठा दगड घेवुन नितीन जमदाडे याच्यावर धावुन गेला. त्याने तो दगड मारला परंतु शिंदे यांनी बीटु पानसरे यास लाथ मारल्याने नितीन जमदाडे हा या हल्ल्यातून बचावला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, पोलीस शिपाई टकले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपींनी तेथून धुम ठोकली होती. पोलीसांनी परिसराचा शोध घेत या गुन्ह्यातील एक दुचाकी ताब्यात घेतली आहे. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लावलेल्या पोस्टरवर असलेल्या हल्ला करणारे दोन आरोपींचे फोटो शिंदे यांनी ओळखले. ते फोटो मोबाइलवर शुट करीत पोलीसांना दाखवल्याने आरोपींची ओळख पटण्यास मदत झाली. याप्रकरणी दत्तात्रय शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने २३ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.