किशोर भोईटे
सणसर : महान्यूज लाईव्ह
भवानीनगर, ता.इंदापूर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर आज संध्याकाळी कोणती मिरवणूक नव्हती किंवा कोणत्या लग्नातील तोफांची आतीषबाजी नव्हती पण तरीही आज कारखान्यासमोर लखलखाट झाला होता. त्याचं कारण आज श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ऐतिहासिक उच्चांक गाठत १२ लाख टनाचा टप्पा पार केला. त्यामुळे कामगारांनी आज ऊन्हाळ्यात दिवाळी साजरी केल्याचे चित्र दिसत होते.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर पूजना दिवशी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील व सर्व संचालक मंडळाने यंदाच्या वर्षी गाळप हंगामात बारा लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आणि आज प्रत्यक्षात १७८ दिवसात बारा लाख टन गाळपाचा टप्पा कारखान्याने पार केला. कारखान्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत हा ऐतिहासिक उच्चांक मानला जात आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्याच्या कामगारांनी आज कारखान्याच्या गेटसमोर फटाक्यांची भव्य आतीषबाजी करत एक प्रकारे दिवाळी साजरी करून आनंद व्यक्त केला. यावेळी कामगारांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
प्रशांत काटे,अध्यक्ष छत्रपती कारखाना
या हंगामात बारा लाख टनाचे उद्दिष्ट ठेवले होते आणि ते आज पूर्ण होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. यामध्ये कारखान्याचे सर्व उत्पादक सभासद, कामगार, ऊस तोड मजूर, वाहतूकदार यांचे यामागे श्रेय आहे. मी या सर्व मंडळींचे मनापासून अभिनंदन करतो.