बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्याच्या जिरायत भागाला पाणीपुरवठा करणारी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाईपलाईन आज अचानक फुटली.
महावितरणकडून अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने पाईपवर पाण्याचा दाब येऊन उपसा सिंचन गृहालगत फुटल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
शिर्सूफळ येथील उपसा सिंचन गृहालगत पाईपलाईन फुटली. पाईपमधून पाण्याचा उंचच उंच फवारा उडत होता. शिर्सुफळ येथून ही पाईपलाईन ७ ते ८ किलोमीटर लांब आहे. अचानक लाईट गेल्याने पाईपलाईनवर दाब आला आणि पंप हाऊसजवळ पाईपलाईन फुटली.
काही दिवसापुर्वी शिरसाई उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली. मात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उपसा सिंचन योजनेत अडचण येत होती. त्यातच आज दुपारी अचानक वीज पुरवठा बंद झाल्याने परत येणाऱ्या पाण्याचा पाईप लाईन वर दाब निर्माण झाला. याचा परिणाम असा झाला की, पंपगृहपासून जवळच पाईप लाईन फुटली. यावेळी खूप उंचावर पाणी उडत होते.
आता या पाईपलाईनच्या दुरुस्तीमुळे ऐन उन्हाळ्यात शेतीला अत्यंत गरजेचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.