शिरूर : महान्युज लाइव्ह
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील अग्नीपंख फौंडेशन व जीवनविद्या मिशन परिवाराने ८५ किलोमीटर सायकल वारी काढून नागरगाव ता. शिरूर येथे भेट देत स्पर्धा परिक्षेतून यशाचे शिखर सर करणाऱ्या ३१ शिलेदारांचा सन्मान केला.
श्रीगोंदा उपविभागाचे पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, जीवनविद्या मिशनचे विश्वस्त संतोष तोत्रे, वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव फराटे, मेघा कुतवळ यांच्या हस्ते श्रीगोंदा येथून आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोविंदराव निंबाळकर होते.
श्रीगोंदा ( जि.अहमदनगर ) येथून सायकल वारी निघाली होती. शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे आगमन झाल्यानंतर फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले.यावेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून खडतर परिश्रम घेत विविध पदावर निवड झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव म्हणाले कि, आई वडील हेच विद्यार्थाच्या जीवनाचा पाया रचतात. शिक्षक त्यावर त्यावर भिंत बांधतात. यशाचे शिखर मात्र स्वत:ला बांधायचे असते. त्यावर प्रेरणा देण्याचे काम अग्नीपंख फौंडेशन करीत आहे. जीवनविद्या मिशनचे संतोष तोत्रे म्हणाले कि, स्पर्धा परिक्षेतून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठले. आता राष्ट्रासाठी चांगल्या भावनेने काम करा, हीच परमेश्वराची सेवा ठरणार आहे. भुजंग मिसाळ यांनी ऊसाच्या फडात राहून विक्रीकर अधिकारी कसा झालो
यांचे पैलू उलगडले. त्यावेळी अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कुरुंदळे यांनी केले तर आभार दत्तात्रय जगताप यांनी मानले.