मुंबई : महान्यूज लाईव्ह
लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडणाऱ्या उत्तर प्रदेशातील मंत्री अजय मिश्रा टेनीच्या मुलाचा जामीन सुप्रिम कोर्टाने रद्द केला आहे. आशिष मिश्रा याला हजर होण्यासाठी एक आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे.
यापुर्वीच सुप्रिम कोर्टाने युपी सरकार आणि आशिष मिश्रा यांना नोटीस पाठवून जामीन रद्द का करू नये अशी विचारणा केली होती. या प्रकरणातील साक्षीदारावर झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिम कोर्टाने चिंता व्यक्त केली होती.
जामीन रद्द करण्याच्या बाजूने युक्तीवाद करताना अॅड. प्रशांत भूषण यांनी या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारावर झालेल्या हल्ल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले होते. या हल्ल्याच्या वेळी साक्षीदाराला ‘ आता राज्यात भाजपा जिंकली आहे, ते त्याच्यावर ‘ लक्ष ‘ ठेऊन आहेत, अशी धमकी दिली असल्याचेही प्रशांत भूषण यांनी सांगितले होते.
शेतकरी आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या विरोधात लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोलन करीत होते. त्यावेळी एका चारचाकी गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्यात आली होती. यामध्ये चार शेतकरी ठार झाले होते. यानंतर आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात भाजपाचे दोन कार्यकर्ते आणि गाडीचालक यांचाही मृत्यू झाला होता. यावेळी झालेल्या हिंसाचारात एक स्थानिक पत्रकारही मरण पावला होता.