सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
शनिवारी इंदापूर तालुक्यातील एका सभेमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बेताल वाक्य वापरले होते, या पार्श्वभूमीवर बेताल व शिवराळ भाषा ही तालुक्याची ओळख नसून मंत्र्यांना न शोभणारी ही भाषा आहे,असे बेताल बोलू नका, अन्यथा भारतीय जनता पार्टी सुध्दा जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी राज्यमंत्री भरणे यांना दिला.
ॲड.शरद जामदार म्हणाले की, ‘ राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यामध्ये भाजपच्या वाढत्या पाठबळामुळे निष्क्रिय लोकप्रतिनिधी सभेमध्ये बेताल बोलत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा तालुका म्हणून इंदापूर तालुका प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात इंदापूर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. टीका करताना वापरलेले शब्द तुमच्या असभ्यपणाचे दर्शन देत आहे. तालुक्याने अशा पद्धतीने टीका करतानाचे चित्र यापूर्वी कधीही पाहिले नाही.
असंस्कृत, मंत्र्यांना न शोभणारी भाषा जर वापरली गेली तर भारतीय जनता पार्टी जशास तसे उत्तर देईल,असा इशारा जामदार यांनी दिला.