महान्यूज लाईव्ह विशेष
२४ तास सतत बातम्या सांगत राहणारे शेकडो न्यूज चॅनेल, सोशल मिडियावरचा माहितीचा महापूर या आजच्या वातावरणात एखाद्या न्यूज चॅनेलवरील अॅंकर ” आज काहीही बातमी नाही.” असे सांगून जर गायब झाला तर……! असे काही होऊ शकते यावर तुमचा विश्वास बसणे कठीण आहे. पण यापुर्वी एकदा असे घडलेले आहे.
१९३० च्या १८ एप्रिलला इंग्लंडमधील हजारो घरातील लोकांनी सायंकाळी ८.४५ वा आपल्या घरातील रेडिओ बीबीसीवरील बातम्या ऐकण्यासाठी सुरु केला. ” गुड इव्हिनिंग, आज १८ एप्रिल, आज काहीही बातम्या नाहीत ” असा वृत्तनिवेदिकेचा आवाज त्यांना ऐकू आला आणि त्यानंतर त्या बुलेटिनच्या १५ मिनिटात केवळ पियानो वाजत राहिला.
बीबीसीच नव्हे तर प्रसारमाध्यमांच्या जगात घडलेली ही अभूतपुर्व घटना होती. असे का झाले याबद्दल आजही चर्चा होते. त्यादिवशी बीबीसीकडे खरोखरच बातम्या नव्हत्या, का ज्या बातम्या होत्या त्या लोकांना सांगाव्या इतक्या दर्जाच्या नव्हत्या. त्या दिवसात बीबीसीला लोकांना सांगावे असे काहीच घडले नव्हते का ? या प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत मिळालेली नाहीत.
खरेतर १८ एप्रिल १९३० रोजी बरेच काही घडले होते. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी सुर्या सेन यांच्या नेतृत्वाखाली चितगॉंवच्या लष्करी ठाण्यावर हल्ला केला होता. अर्थात त्यांनी त्यांनी टेलिफोन आणि टेलिग्राफच्या तारा तोडून टाकल्याने त्याची माहिती बीबीसीपर्यंत पोचली नसावी.
परंतू याखेरीज बरेच काही सांगण्यासारखे या दिवशी घडले होते. एका नामवंताचा मृत्यू झाला होता. एका ठिकाणी मोठी आग लागली होती. एका ठिकाणी वाहनाचा अपघात झाला होता. परंतू बीबीसीच्या त्या दिवशी हे सांगणे महत्वाचे वाटले नाही का ?
एक अंदाज असा आहे की, ब्रिटीश सरकारने त्यावेळच्या वृत्तपत्रांवर काही निर्बंध लादले होते आणि बीबीसी रेडिओवरही असेच निर्बंध येण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याचा निषेध म्हणून त्या दिवशी गप्प राहण्याचा निर्णय बीबीसीने घेतला होता.
एखाद्या बातम्या देण्याचा व्यवसाय असणाऱ्या संस्थेने एक दिवशी ” आज काहीच बातम्या नाहीत ” असे म्हणणे हे खरेच आज आर्श्चयकारक वाटते. १८ एप्रिल १९३० च्या दिवशी बीबीसीने असे का म्हणले हेदेखील आजपर्यंत एक गुढ बनून राहिले आहे.