बारामती : महान्यूज लाईव्ह
एसटी कामगारांचे नेते बनलेले अॅड. गुणरत्न सदावर्तेंपुढील अडचणी आता दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात एका बारामतीकराने आज पुढे आणलेला व्हिडिओ त्यांच्या अडचणीत भर घालणारा ठरणार आहे. या व्हिडिओत अॅड. सदावर्ते आपल्याच तोंडाने आपण कसा कायदा मोडत आहोत हे सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या आधारे त्यांच्यावर आणखी एक गुन्हा आता दाखल होण्याची शक्यता आहे.
बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी आपल्या व्टिटर हॅंन्डलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या १२ वर्षाच्या मुलीच्या हातात आपल्या चारचाकी गाडीचे स्टेअरिंग दिलेले आहे. ठाणे ते दादर हायवेवर त्यांची ही मुलगी फॉर्चुनर गाडी चालवते आहे, आणि तिचे वडिल अॅड. गुणरत्न सदावर्ते शेजारी बसून या प्रसंगाचा व्हिडिओ करत आहेत. याचबरोबर ते रनिंग कॉंमेंट्री करत स्वत:च्याच तोंडाने आपली अल्पवयीन मुली चारचाकी गाडी चालवत असल्याची कबुली देत आहेत.
नितीन यादव यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना महाराष्ट्र, ठाणे पोलिस आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनाही टॅग केले असून अल्पवयीन मुलीस हायवेवर गाडी चालविण्यास देऊन लोकांच्या जिविताला धोका निर्माण करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.