मुंबई : महान्यूज लाईव्ह
राजकारणी आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध हा तसा नेहमीचा विषय आहे. दिवसाचे २४ जनतेच्या प्रेमात असणारे हे नेते त्यातील काहीजणींच्या जास्तच प्रेमात न पडले तरच नवल. त्यामुळे एकापेक्षा जास्त महिलांशी संबंध असणे हे राजकीय नेत्यांबाबतील नैसर्गिक गोष्टच ठरली आहे. त्याला फारच थोडे सन्माननीय अपवाद आहेत.
यामध्ये हिंदू व्दिभार्या प्रतिबंधक कायद्याने त्यांची अडचण करुन ठेवली आहे. त्यामुळे रितसर दुसरे लग्न करणे हा गु्न्हा ठरतो. त्यानंतर दोनपेक्षा जास्त मुले झाली तर लोकप्रतिनिधी होता येत नाही, ही आणखी एक अडचण आहे. पण कोणत्याही अडचणीवर मात केली नाही तर ते राजकारणी कसले.
आता लिव्ह इन रिलेशनशीप नावाचा गोंडस प्रकार या नेत्यांच्या मदतीला धावून आला आहे. यामुळे ‘ दुसरी ‘ किंवा ‘ तिसरी ‘ असली तरी लिव्ह इन रिलेशनशीपचे लेबल लावून दिले की मोकळे होता येते.
परंतू हि लिव्ह इन रिलेशनशीप कधीकधी चांगलीच अंगाशी येते. याचा एक अनुभव सध्या धनंजय मुंडे हे कल्पना शर्मा – मुंडे यांच्या रुपाने घेतच आहेत. यापुर्वी महाराष्ट्राच्ये वनमंत्री संजय राठोड यांना अशाच प्रकारातून मंत्रीपद सोडावे लागले आहे.
आता यामध्ये शिवसेना ते भाजपा व्हाया राष्ट्रवादी असा पक्षीय प्रवास असलेले आमदार गणेश नाईक यांची भर पडली. गणेश नाईकांसोबत २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलेल्या दिपा चौहान या महिलेने आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
यापुर्वी ही तक्रार दाखल करुन घेतली जात नव्हती. आता राज्य महिला आयोगाने दखल घेतल्यानंतर सीबीडी पोलिस ठाण्यात गणेश नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षे आपण गणेश नाईकांसोबत राहत असून आपल्याला त्यांच्यापासून मुलगाही आहे, असे या महिलेने या तक्रारीत म्हणले आहे. मुलाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी केल्यानंतर त्यांनी आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.
याच प्रकरणी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनीदेखील नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून आमदार गणेश नाईक यांनी डीएनए चाचणी करून घ्यावी असे म्हणले होते.