मुंबई : महान्यूज लाईव्ह
ती कोणी मोठी राजकारणी नव्हती, न होती कोणी श्रीमंत उद्योजिका. पण त्या पाकिस्तानी महिलेच्या निधनानंतर भारताच्या पंतप्रधानांचेही ह्दय हेलावले. माणुसकीच्या या नात्याने सरहद्दीची सगळी कुंपणे तोडून टाकली.
‘ मानवतेचे कार्य आयु्ष्यभर केलेल्या बिल्किस ईदाही याचे जगणे जगातील सगळ्या लोकांना भारावून टाकणारे आहे. भारतीयही त्यांना नेहमी स्मरणात ठेवतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ‘ या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पाकिस्तानी समाजसेवक महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे.
बिल्किस ईदही हे तिचे नाव. भारत आणि पाकिस्तानदरम्यान काही वर्षापूर्वीपर्यंत चालविल्या जाणाऱ्या समझोता एक्स्प्रेसमध्ये लाहोरमध्ये एक सात आठ वर्षाची मुलगी एकटीच बसलेली सापडली. त्या मुलीला बोलता येत नव्हते. ही मुलगी या बिल्किस ईदही यांच्या संस्थेकडे सुपूर्त करण्यात आली. या मुलीचे नाव गीता ठेवले गेले. तिला हिंदू धर्माप्रमाणे आचरण करण्यास मोकळीक दिली गेली. अगदी स्वत:च्या मुलीप्रमाणे बिल्किस यांनी गीताला वाढविले. गीताला बोलता येत नव्हते. ती आपला पत्ता किंवा आईवडिलांबद्दल काहीच सांगू शकत नव्हती. बिल्किस ईदही यांनी भारत सरकारशी संपर्क साधून तिच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर २०१५ मध्ये गीता भारतात आली.
पाकिस्तानातील १६००० हुन जास्त जन्मत: आईवडिलांनी सोडून दिलेल्या अनाथांची बिक्लिस आणि त्यांचे पती हे आईवडिल बनले. त्यांच्या घरात तसेच त्यांच्या संस्थेच्या देशभरातील शाखांमध्ये एक पाळणा लावलेला होता. ज्यांना आपले मुल नको आहे, अशी कुणीही माता आपले मुल त्या पाळण्यात सोडून जाऊ शकत असे. त्या अनाथ बाळाचे संगोपत बिल्किस ईदाही करत असत.
शुक्रवारी कराची येथील रुग्णालयात वयाच्या ७४ व्या वर्षी बिल्किस ईदाही मरत पावल्या. पाकिस्तानमध्ये हजारो जण त्यांच्या जाण्याने दु;खात आहेतच पण जगभरातून त्यांच्या जाण्यामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.