सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा ध्यास घेऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यात चौफेर विकासात्मक दृष्टीने पावले उचलली आहेत.
इंदापूर तालुक्यात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा महापूर वाहत आहे.आज ( १७ एप्रिल ) बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर शहरातील तब्बल १० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडणार आहे.

हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होत असून हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नवीन वर्ग खोल्यांचे आणि इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतू कार्यालयाच्या उद्घाटनाबरोबरच इंदापूर शहरातील चौक सुशोभीकरण व इंदापूर शहर अंतर्गत पथदिवे बसविणे, तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडणार आहेत.
कार्यक्रमासाठी, इंदापूर तालुका व शहरातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष, नगरसेवक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या देदीप्यमान सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी केले आहे.