घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ( मारुती स्त्रोत्र )
मनाच्या वेगाने धावू शकणाऱ्या हनुमंतालाही आज आश्चर्य वाटावे अशी स्थिती आज महाराष्ट्रात उत्पन्न झाली आहे. आपले ऐवढे भक्त आहेत, हे पाहून रामचरणी लीन असलेल्या त्या प्रथम भक्ताच्याही मनात थोडा अहंकार निर्माण झाला असेल का ? कदाचित प्रभू रामचंद्रांची ही लिला पाहून त्याच्या ओठावर थोडे हसूदेखील फुटत असेल.

महाराष्ट्रात पुर्वीपासूनच हनुमानाची भक्ती आहे. शक्तीच्या उपासनेसोबत तालमीच्या आखाड्याच्या बाजूलाच या हनुमानाची भक्ती चालत असे. पण गेल्या काही दिवसांपासून राजकीय हनुमानभक्तीला मोठा जोर चढला आहे. काही दिवसांपूर्वी मशिदींसमोर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचा पाठ करण्याची घोषणा करून राज ठाकरेंनी या राजकीय हनुमान भक्तीला सुरुवात केली.
पण हनुमानाला राजकारणात आणणारे राज ठाकरे पहिले नाहीत, तो मान जातो दिल्लीच्या आम आदमी पक्षाकडे. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीत आम आदमी पक्षाने अखेरच्या क्षणी याच हनुमंताच्या पायाशी आश्रय घेतला. भाजपाच्या ‘ जय श्रीराम ‘ ला आम आदमी पक्षाकडे काही उत्तर नव्हते, ते त्यांना अचानकपणे ‘ जय हनुमान ‘ मध्ये सापडले. मग अरविंद केजरीवालांनी जाहीरपणे हनुमान चालिसाचे पठण केले. अर्थातच भारतीय परंपरेनूसार देवापेक्षाही भक्ताची ताकद जास्त असते. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणाच्या आखाड्यात राजकीय रामभक्तांना राजकीय हनुमानभक्तांनी चितपट केले.
आता महाराष्ट्रात नव्याने हनुमानभक्तीने जोर धरला आहे. पण दोन्हीमध्ये ३६० अंशांचा फरक आहे. दिल्लीत ‘ जय श्रीराम ‘ विरोधात ‘ जय हनुमान ‘ असा रामभक्त विरोधात हनुमानभक्त असा सामना होता. याउलट महाराष्ट्रातील नवाकोऱ्या हनुमानभक्ताला रामभक्तांच्या कडेवर जाऊन बसण्याची भलतीच घाई झाली आहे. या अचानक वाढलेल्या हनुमानभक्तीने मनातल्या मनात गुदगुल्या होत असल्या तरी समस्त हिंदू धर्माच्या भक्तीचे स्वयंघोषित पेंटंट घेतलेल्या भाजपाला या हनुमानभक्ताचे नेमके करावे तरी काय हेच कळेनासे झाले आहे.
या हनुमानभक्तीचे वारे अचानक इतके वाढले की अमरावतीच्या एका दांम्पत्यालाही अचानक आपण हनुमानाचे भक्त असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी तर थेट महाराष्ट्राच्या राजधानीत जाऊन मुख्यमंत्र्याच्या निवासाबाहेरच हनुमान चालिसा पठण करावा असा अनाहूत सल्ला दिला. अमरावतीच्या खासदार आणि आमदार राणा दांमप्त्याच्या हा सल्ला शिवसैनिकांनी इतका गंभीरपणे घेतला की आज हनुमान जयंतीदिवशी मातोश्रीबाहेर चक्क हनुमान चालिसाचे पठण झाले,
त्यासोबत हनुमान भक्त राणा दांम्पत्याला शिव्यांची लाखोली वाहण्याचाही कार्यक्रम पार पडला. दुसरीकडे पुण्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. त्याचबरोबर आज हनुमान जंयतीदिवशी राज्यातील मारुतीमंदिरात मेकअप करुन आलेल्या राजकारणी भक्तांची गर्दी अचानक वाढलेली दिसते आहे.
भक्त हनुमंताची एक गोष्ट आहे. त्याला सीतामाईने एकदा त्याला हिऱ्याची माळ भेट म्हणून दिली. थोड्या वेळाने सीमामाई पाहते तो काय, हनुमान त्या माळेतील एकेक हिरा फोडून टाकतो आहे. सीतामाईने हनुमानाला असे काय करतोस, असे विचारले. त्यावेळी या रामभक्ताने उत्तर दिले.
‘ ज्यामध्ये राम नाही असे काहीही मला नको आहे. या हिऱ्यामध्ये राम आहे का ते मी पाहत होतो. पण हे तर नुसते दगड आहेत. म्हणून मी ते फोडून टाकत आहे. ‘ कथा पुढे असे सांगते की हनुमानाने स्वत:ची छाती फोडून सीतामाईला रामाचे दर्शन घडवले.
श्रीरामाच्या ऐवढ्या निस्सिम भक्ताला या अचानक वाढलेल्या हनुमानभक्तीत काहीच ‘ राम ‘ नाही, हे कळल्याशिवाय कसे राहिल.