सातारा : महान्यूज लाईव्ह
छत्रपती घराण्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एड. गुणरत्न सदावर्ते याला काल सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

एसटी कामगारांच्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यावरून गुणरत्न सदावर्ते याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर सातारा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि सातारा पोलिसांनी त्यास सातारा येथे आणले.
सातारा शहर पोलिसांनी सदावर्ते याला अटक करून न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाचे वकील एडवोकेट अॅड अंजुम पठाण यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला तर सचिन थोरात, सतिश सूर्यवंशी आणि प्रदिप डोरे यांनी सदावर्ते याची बाजू मांडली.
ऑक्टोबर 2020 मध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एका वृत्तवाहिनीवर आक्षेपार्ह वक्तव्य करत सदावर्ते याने छत्रपतींच्या राजघराण्यांबाबत वक्तव्य केले होते. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याप्रकरणी सदावर्ते याला पोलिसांनी ताब्यात घेतले.