माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
आपल्या देशातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे असा शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये संसदेत पारित करण्यात आला. याला आता १२ वर्षांहून अधिक काळ लोटला. भारतीय संविधानाची निर्मिती करताना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येकाला प्राथमीक शिक्षण मोफत मिळावे अशी तरतूद करून ठेवली होती. मात्र, मागील ७२ वर्षात देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळू शकलेले नाही. हे वास्तव आहे. आजही देशातील करोडो मुलं शिक्षणाच्या परिघाबाहेर आहेत. यामध्ये स्थलांतरीत मजूरांच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. या स्थलांतरीत मजूरांपैकीच एक घटक म्हणजे विटभट्टीवर काम करणारे मजूर. दरवर्षी सहा महिने आपले गाव, जिल्हा, राज्य सोडून येणारे मजूर सोबत मुलांनासद्धा घेऊन येतात. या सहा महिन्यांच्या काळात या मुलांची शाळा पुर्णपणे बंद असते. त्यामुळे मुलांमध्ये प्रतिभा असूनही ती शिक्षणापासून तुटून जातात. आणि पिढानपिढ्या मजुरीच्या विळख्यात अडकून पडतात. महाराष्ट्रात दरवर्षी शिक्षणाबाहेर फेकल्या जाणाऱ्या मुलांची संख्या काही लाखांमध्ये आहे. पण याकडे कोणाचेही लक्ष नाही.
या सगळ्याचा विचार करून ‘अराईस विश्व सोसायटी’ (Arise Vishwa Society) या स्वयंसेवी संस्थेच्या ‘मिलाफ’ (Milaph) प्रकल्पाच्या माध्यमातून दर रविवारी आम्ही विटभट्टीवरील मुलांची शाळा भरवतो.
रखरखतं ऊन, माती, पाणी, चिखल, चिखलात बरवटलेले हात, लोखंडी साचा, त्याच्यात मातीचा चिखल भरत असलेले भट्टीवरील मजूर. या मजुरांना मदत करणारी त्यांची मुले. भट्टी लावण्यासाठी गाडा ओढणे, एकावर एक विटा रचून त्याची भट्टी तयार करणे. भाजून तयार झालेल्या विटांची लॉरी, ट्रॅक्टरची ट्रॉली आपल्या आई-वडीलांसोबत भरणारी ही मुले. चिखल, माती, विटांच्या उचलापाचलीमुळे खरबरीत झालेले हात. हातावर, तोंडावर मातीचा बसलेला थर. वरखडलेल्या वनांसारखे पांढरे पडलेले पाय. मातीने मळलेली कपडे. उन्हाने रापलेले चेहरे. काळी पडलेली त्वचा. अशी विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची आणि त्यांच्या मुलांची परिस्थिती. भट्टीवरील टुकड्या-टाकड्यांपासून बनवलेल्या कोप्या. एका ढांगेच्या कोपीत कंबरेपर्यंत वाकल्याशिवाय आत शिरता येत नाही. सगळ वातावरण निस्तेज. कुठल्याही विटभट्टीवर गेल्यास प्रत्येकाला बऱ्यापैकी असेच चित्र दिसेल. त्यामुळेच आपल्या समाजातील दुर्लक्षित झालेल्या या मुलांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी विटभट्टीवरील शाळेचा खटाटोप सुरु आहे.
पुणे-सासवाड रस्त्यावरील बोपदेव घाटाच्यावर असलेल्या आक्सरवाडी मधील विटभट्ट्यांवर या शाळा भरवल्या जातात. आम्ही पहिल्या दिवशी चौकशी करण्यासाठी जेव्हा या भट्ट्यांवर गेलो तेव्हा ही मुलं त्यांच्या पालकांसोबत भट्टीवर काम करत होती. या सगळ्या मुलांना एकत्र करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे का ? शिकायचं आहे का ? आम्ही शिकवले तर चालेल का ? असे प्रश्न विचारले तर सर्वांचे उत्तर अगदी आनंदाने हो असे आले. मग त्यांच्या पालकांशी चर्चा केली त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी विटभट्टी मालकाची परवनगी घ्या अशी सुचना केली. त्यानंतर भट्टी मालकाची परवानगी मिळवली. भट्टी मालकांच्या परवानगीशिवाय आम्हाला तिथे काहीही करता आले नसते. मग काय झाली आमची शाळा सुरू.
पहिल्या दिवशी भट्टीवरील मुलांचा सर्व्हे केला. मुलांची संख्या, वय, शिक्षण, गाव आदीची माहिती घेतली. यातून असे लक्षात आले की प्रत्येक विटभट्टीवर शिक्षण घेत असलेली सरासरी १० ते १२ बारा मुले आहेत. यातील बहुसंख्य मुलं आपल्या आई-वडीलांसोबत विटभट्टीवरच काम करतात. विटा वाहणे, चिखल कालवणे, भट्टी लावणे, भाजलेल्या विटांची गाडी भरणे अशी श्रमाची कामे करत असतात. विटभट्टीवर विरंगुळ्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने काम करतच स्वतःचा विरंगुळा करून घेतात. यातून पालकांना मदतही होते आणि मुलं दिवसभर त्यांच्या नजरेसमोर राहतात.
या मागील तीन महिन्यांमध्ये मुलांशी संवाद साधताना आलेली काही निरक्षणे इथे नोंदवत आहे. या मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. त्यांना अभ्यास करायला आवडतो. पण शिकण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने त्यांचा नाईलाज होतो. पालकांनाही आपली मुलं शिकावीत असेच वाटते. अनोळखी ठिकाणी आल्यामुळे भट्टी पासून शाळा दूर असतात. कामाची आणि शाळेची वेळ जुळत नसल्याने नाईलाजाने कामाला प्राधान्य द्यावे लागते. अनोळखी ठिकाण असल्याने मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यास पालक धजावत नाहीत. पालक स्वतः अडाणी असल्याने त्यांना मुलांना शिकवता येत नाही. पोटाचाच प्रश्न गंभीर असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे इच्छा असूनही लक्ष देता येत नाही. या मुलांमध्ये स्पार्क असतो. मेहनतीची तयारी असते. पण केवळ योग्य मार्गदर्शन व संधी न मिळाल्याने ही मुलं मागे पडतात. भट्टीवर काम करणारी बहुतेक सर्व कुटुंब मागासवर्गीय समाजातील आहेत. मागासवर्गीय असल्याने या मुलांच्या शिक्षणासाठी अनेक योजना आहेत. परंतु, प्राथमिक शिक्षणही पुर्ण होत नसल्याने या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही मुलं पात्रच ठरत नाहीत.
यातील काही उदाहरणे पाहूयात.
१) भीमाशंकर गुरुशांतप्पा अक्कलकोट, वय वर्ष १३ रा. जाळकी, ता. आळंद, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक. हा मुलगा सातवीमध्ये आहे. पण मागील सहा महिन्यांपासून शाळेच तोंड पाहिलेल नाही. अभ्यासाशी काडीचाही संबंध आला नाही. तरीही भीमाशंकरच अक्षर मोत्यासारख सुरेख आहे. त्याला लिहायला आवडत. तो कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतो. येथील गावातल्या शाळेत का जात नाही असे विचारले असात भीमाशंकर म्हणाला “ गावाला कोणी सांभाळण्यासाठी नसल्यामुळे आई-वडील इथे घेऊन आले. येथील शाळा मराठी शाळा असल्यामुळे जाता येत नाही. मराठी भाषा थोडी-थोडी समजते पण चांगली बोलता आणि लिहीता येत नाही. मग इथं दिवसभर बसून काय करायच म्हणून वडिलांना विटा बनवायला मदत करतो. मी स्वतः कमवलेल्या पैशातून नवीन मोबाईल घेतला आहे. आता गावाला परत गेल्यावर तिथल्या शाळेत परत जाणार.”
२) राणी बसवराज श्रीगणी, वय ११ वर्ष, गाव माड्याळ, ता. आळंद, जि. कलबुर्गी, राज्य कर्नाटक. ही मुलगी मागील चार महिन्यांपासून विटभट्टीवर आहे. ती गावाला ५ वीच्या वर्गात शिकते. तिलाही अभ्यास करायला लिहायला वाचायला खुप आवडते. तिला विचारले तु का आलीस इथे. राणी म्हणली, “ आई-वडील दोघेही भट्टीवर काम करतात. मला तीन लहान भावंड आहेत. त्यांना सांभाळायला कोणचं नसत म्हणून आई-वडील घेऊन आले आहेत.” राणी दिवसभर मुलांना सांभाळत घरातील कामे करते. तिला इंग्रजी शिकायला आवडत. पुढे जाऊन तिला पोलिस व्हायचे आहे. त्यासाठी धावण्याचा सराव, व्यायाम करावा लागतो. हे ती आम्हाला सांगत होती. पण पोलिस होण्यासाठी शिकावही लागत हे मात्र तिला सांगता आले नाही.
३) अक्षरा राजेश घाटे, वय ९ वर्ष, मन्सकर्गा, ता. देगलूर, जि. नांदेड. ही मुलगी ३ री च्या वर्गात शिकते. सहा महिन्यांपासून भट्टीवरच आहे. आई-वडीलांना विटांचा गाडा ढकलायला आणि भट्टी लावायला मदत करते. अक्षराला अभ्यास करायला प्रचंड आवडतो. दर रविवारी ती आम्ही येण्याची आतुरतेने वाट बघत असते. शिकून तुला काय बनायचे असे विचारल्यावर म्हणाली, “ मला न्यायाधीश व्हायचं आहे. त्यासाठी मी खूप शिकणार. पण माझ्याकडे वही-पुस्तक काहीच नाही. तुम्ही दिलेल्या वहीवरच मी रोज अभ्यास करते. ”
४) किर्तन घाटे, वय १३ वर्ष रा. सुवगाव, ता. देगलूर, जि. नांदेड. शिक्षण ७ वी. हा मुलगा प्रचंड हुशार आहे. मागील सहा महिन्यांपासून अभ्यासाचा गंधही नसलेल्या या मुलाचे ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत. याला कुठलाही शब्द सांगितला तरी त्याचे अचूक स्पेलिंग हा मुलगा सांगतो. त्याचे सामान्य ज्ञान खूपच चांगले असून कितीतरी इंग्रजी शब्द त्याला माहिती आहेत. किर्तनला विचारले तु कसा अभ्यास करतोस, “ तोंडीच अभ्यास करतो. वह्या-पुस्तक नसल्यामुळं लिहायला मिळत नाही. मला अभ्यास करायला आवडते. पण इथे कुठलीच सोय नाही. त्यामुळं नाही करता येत. ”
५) नंदिनी, वय १२ वर्ष, ता. देगलूर जि. नांदेड, शिक्षण ६ वीच्या वर्गात शिकते. आई-वडिलांना कामातून वेळ मिळत नाही. म्हणून स्वयंपाकापासून घरातील सगळ काम ही मुलगी करते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. भट्टीवरील सर्व मुलांसाठी तीने अनेकदा पावभाजी बनवली आहे. या मुलीला शिक्षणात देखील खूप रस आहे. आम्ही भट्टीवर आलेलो पाहताच हातातील सगळ काम सोडून सगळ्या मुलांना गोळा करण्याच काम ही मुलगी करते.
ही काही प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. ही यादी कितीही वाढू शकते. कारण येथील प्रत्येक मुलामध्ये काहितरी वेगळेपण आहे. दोन विटभट्ट्यांवर आम्हाला २५ मुलं अशी सापडली ज्यांचा शाळेत प्रवेश आहे. परंतु, मागील चार-सहा महिन्यांपासून त्यांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. राज्यात हजारो तर देशात लाखो विटभट्ट्या असतील. येथील मुलांचा आकडा किती असेल?
या मुलांचे शिक्षणा सोबतच आरोग्य, कुपोषण यांसारखे प्रश्न देखील गंभीर आहेत. त्यामुळेच माणूस म्हणून जगण्याच्या मुलभूत आणि प्राथमिक हक्कांपासून ही मुलं वंचित आहेत. आणि हा केवळ एक वर्षाचा प्रश्न नाही. वर्षानुवर्ष हे चक्र सुरूच आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष आहे ना समाजाचे. शिक्षणाची सर्वाधीक गरज असलेल्या या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, ती होताना दिसत नाही. सरकारी पातळीवरील उदासिनता यामुळेच आम्हाला विटभट्टीवर जाऊन या मुलांना शिकविण्याची गरज भासली. या मुलांच्या भवितव्यासाठी समाजानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना किंवा वयक्तीक पातळीवर शक्य तवेढी मदत आणि वेळ या अशा मुलांच्या विकासासाठी देण्याची गरज आहे.
संस्थेविषयी थोडक्यात..
अराईस विश्व सोसायटी ही स्वयंसेवी संस्था मागील आठ वर्षांपासून शालाबाह्य, झोपडपट्टी, अनाथ आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी काम करते. झोपडपट्टीमधील मजूरी करणाऱ्यांच्या मुलांसाठी डे केअर सेंटर, अनाथ मुलांचे कौटुंबीक पुर्नवसन करण्याचे काम करते. यासोबतच झोपडपट्टी आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील विविध प्रकारचे काम संस्थेच्या वतीने केले जात आहे.