सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी,अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून अधिकारी घडावेत, यासाठी अद्ययावत अभ्यासिका व महिलांना कार्यक्रम, उपक्रम घेण्यासाठी अद्ययावत इमारत उभारण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ५० लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीसाठी जाहीर केला. विशेष म्हणजे उपस्थितांकडून काहीतरी मिळावे अशी सहजच अपेक्षा व्यक्त झाली असताना राज्यमंत्री भरणे यांनी भरघोस निधी जाहीर करत आश्चर्याचा धक्का दिला. टाळ्यांच्या कडकडाटात राज्यमंत्री भरणे यांचे उपस्थितांनी आभार मानले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटीमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, या भागात खुप उजेड दिसत आहे. येथील प्रकाशमयी वातावरणात भावी पिढीला यशाची शिखरे गाठता यावीत, यासाठी येथील मुलामुलींची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार निर्माण व्हावी, त्यांना अतिशय शांततेत अभ्यास करता यावा यासाठी तसेच अभ्यासानंतरच्या इतर वेळेत महिलांना सामाजिक कार्यक्रम तसेच उपक्रम घेण्यासाठी सुसज्ज सभागृह असावे म्हणून हा निधी देत असल्याचे भरणे यांनी जाहीर केले.यासाठी तात्काळ एक प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोसायटीच्या आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश मखरे व पवन मखरे यांनी राज्यमंत्री भरले यांचा यथोचित सन्मान केला.
नगरसेवक अनिकेत वाघ, माजी नगरसेवक अविनाश मखरे यांनीही उपस्थित राहून आंबेडकर जयंती साजरी केली. प्रदीप गारटकर यांचा सत्कार कमिटीचे उपाध्यक्ष सुयोग भोसले, श्रीकांत मखरे, संजीत मखरे, निखिल मखरे, विनर चव्हाण, सिद्धार्थ मखरे, संघर्ष मखरे, दर्शन सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विलासदादा मखरे, सुधीर मखरे, रवी चव्हाण, नामदेव मखरे, अशोक वाघमारे, अंकुश भोसले, सर्जेराव मखरे, हनुमंत चव्हाण, लक्ष्मण मखरे आदी प्रमुख उपस्थित होते.