सणसर : महान्यूज लाईव्ह
गाव गाड्यातील सरपंचाला समाजात एक वेगळे स्थान आहे. ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक. गाव करील ते राव करील काय अशी म्हणही प्रचलित आहे. मात्र सणसर ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड. रणजीत निंबाळकर यांच्या कामाची सध्या तालुक्यात आणी जिल्हयात चर्चा आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी गावात विविध विकास कामे राबवली जातात. प्रामुख्याने रस्त्यांच्या कामांमध्ये ठेकेदार आणि ग्रामपंचायत सरपंच यांचे नाते कसे असते याची अनेक उदाहरणे आपण ऐकत असतो. मात्र सणसरचे सरपंच एकदा टेंडर होऊन ठेकेदाराचे काम सुरू झाले की ज्या ठिकाणी काम चालू आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा एक माणूस कॅमेरा घेऊन त्या कामावर लक्ष ठेवत असतो.
अगदी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामातही आजच्या दिवसात किती पोती सिमेंट, वाळू वापरले. एवढेच काय हे काम होऊन दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पाणी मारले का याचीही चाचपणी सरपंच घेत असतात. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ॲड. रणजीत निंबाळकर हे सणसरच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले.
चालू टर्ममध्ये त्यांचा १३ महिन्यांचा कार्यकाळ चालू आहे. या तेरा महिन्यात साधारण तेरा कोटीच्या आसपास वेगवेगळी विकास कामे झाली आहेत. अजूनही काही कोटींची कामे प्रस्तावित आहेत.
नागरिकांच्या सुविधेसाठी खांबावरील बल्ब, बंदीस्त गटर लाईन, रस्ते, आरोग्य सुविधा इथपासून ते आगामी काळात वाढत्या लोकसंख्येचा विचार करून अशा कामाची गरज ओळखुन प्रस्ताव तयार करण्यापासुन ते काम मंजूर करेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे आणि काम ठेकेदाराला दिल्यानंतर त्यावर दर्जेदार कामासाठी अंकुश ठेवण्याचे काम ते करत असतात. त्यामुळे सध्या त्यांच्या नावाची चर्चा जिल्हाभर चालू आहे.
ॲड रणजीत निंबाळकर, सरपंच ग्रामपंचायत सणसर,
वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाने व सणसर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने माझे काम सुरू आहे. ग्रामपंचायत गावचा आत्मा असते. विकास काम करताना ते दर्जेदार व्हावे यासाठीच माझा प्रयत्न असतो. कामे दर्जेदार नाही झाली तर त्या कामाचा उद्देश साध्य होणार नाही. नागरिकांच्या मूलभूत गरजांची पुर्तता करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य प्राधान्य देतो.