बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीची तेजस्विनी मलगुंडे आता महाराष्ट्र हॉलिबॉल संघाची कर्णधार बनली आहे. आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ती या स्थानावर पोचली आहे.

जयसिंगपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत तेजस्विनी पुणे विभागाच्या संघातून खेळत होती. या स्पर्धेत पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तेजस्विनीने संरक्षण, चढाई, अटकाव आणि सर्व्हिस या सर्व बाजूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. तिच्या या कामगिरीच्या जोरावरच ती आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने रुद्रपुर उत्तराखंड येथे दि. ११ ते १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या युथ ( २१ वर्षाखालील ) राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र मुलीच्या संघाची कर्णधार म्हणून तेजस्विनी मलगुंडेची निवड करण्यात आलेली आहे. तेजस्विनी ही बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू आहे. महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक शिवाजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथेच सध्या हा संघ राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करतो आहे.
तेजस्विनीच्या या यशाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तहसीलदार विजय पाटील, तालुका क्रीडा अधिकारी बारामती महेश चावले,जिल्हा क्रीडा संकुल समिती पुणेचे बारामतीचे सदस्य अविनाश लगड व बारामतीच्या क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाचे मार्गदर्शक, खेळाडू यांनी तिचे अभिनंदन केले..