घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
वैदिक काळात मासांहार हा यज्ञविधीचाही भाग होता, त्यामुळे त्यावेळेच्या हिंदू अथवा वैदिक धर्माचे पालन करणारे सर्वजण मासांहार करत होते. याची चर्चा आपण पहिल्या भागात केली. तो भाग या लिंकवर तुम्ही वाचू शकता. https://mahanews.live/?p=33418
पण ज्या धर्माचे नाव घेऊन सगळ्या जगभर दररोज कुठे ना कुठे, कुणाचे ना कुणाचे तरी डोके फोडले जात असते, त्या धर्माची नेमकी व्याख्याही आजपर्यंत जगात कुणालाही करता आली नाही. अशा या धर्माची ही मनोरंजक आणि तितकीच निरर्थक गोष्ट आजच्या भागात पाहूया.
ज्यांना एक ईश्वर मानणाऱ्यांचा धर्म म्हणतात अशा तीन धर्मांची, म्हणजेच ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माची ही कथा आहे. यांना अब्राहमी धर्मही म्हणतात, कारण हे तीनही धर्म अब्राहम आपला मुळ पुरुष असल्याचे मानतात. हे तीनही धर्म बायबल धर्मग्रंथाचा पहिला भाग मानतात. ९० टक्क्यांहून अधिक बाबींमध्ये समानता असलेल्या या धर्मांच्या अनुयायांनी एकमेकांशी संघर्ष करताना जगभरात रक्ताचे पाट वाहिले आहेत.
ही गोष्ट आहे या धर्मांतील धर्मग्रंथांची. हे तीनही धर्म आपल्याकडे ईश्वराने पुस्तकाच्या रुपाने ज्ञान पाठवले असल्याचा दावा करत असतात. आता या देवाने पाठविलेल्या पुस्तकांचे नेमके वास्तव काय ते पाहूया.
देवाने पहिला लिखित संदेश दिला तो ज्यू धर्माचा संस्थापक मोझेसला. हा संदेश म्हणजे दहा पाट्या होत्या. या प्रत्येक पाटीवर एक शब्द लिहलेला होता. ( देवाने हा संदेश दिल्याच्या काही काळातच मोझेसने या पाट्या फोडून टाकल्या. देवाचा संदेश घेण्यासाठी त्याला परत एकदा जावे लागले ही एक वेगळी गोष्ट आहे, ती परत कधीतरी ).
प्रत्यक्ष देवाकडून आलेला हा पहिला संदेश किंवा आज्ञा. आता पुढे या दहा शब्दांचा अर्थ सांगण्यासाठी दहा वाक्ये तयार झाली. या दहा वाक्यानेही अर्थबोध होईना म्हणून त्याचा अर्थ सांगणारी पुस्तके निघाली. देवाच्या या दहा आज्ञा कशा पाळल्या पाहिजेत यावर मत मतांतरे झाली, त्याची पुस्तके अनेकांनी लिहली. अखेरीस ज्यू धर्मात शेकडो धर्मग्रंथ निर्माण झाले. या दहा शब्दांचा आपआपल्या परीने अर्थ लावणाऱ्या धर्मपंडितांचे पेव निर्माण झाले. त्यामुळे हा ज्यू धर्म मोठ्या कर्मकांडात फसला. ज्यू धर्मियांचे प्रत्येक कृत्य धर्मपंडितांनी नियंत्रित करायला सुरुवात केली. हजारो नियम, त्याचे उपनियम, गुन्हे आणि शिक्षा आणि शेवटी देवाला काहीतरी देऊन करायचा पश्चाताप यातून पुरोहितशाहीच्या हातात हा धर्म गेला.
यानंतर याच धर्मातून येशू ख्रिस्त पुढे आला. त्याने या धर्माचे सगळे दोरखंड तोडण्याचा प्रयत्न केला. अगदी साधे सरळ तत्वज्ञान त्याने सांगितले. येशूने त्याच्या सगळ्या आयुष्यात एक शब्दही लिहून ठेवला नाही. त्याला लिहता येत होते की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. पण त्याने असे सांगितले, की हे ज्यू धर्मियांना धर्माचा खरा अर्थ कळालाच नाही, तो मी सांगतो. त्यांने केलेल्या उपदेशाला मानणाऱ्यांचा जो धर्म तयार झाला, तो ख्रिश्चन. येशू गेल्यानंतर काही वर्षांनी त्याच्या अनुयायांनी त्याने काय सांगितले, ती लिहायला सुरुवात केली. ते बनले ख्रिस्ती धर्मातील मुळ लिखाण. या आधारावर बायबल उभे राहिले, आणि बायबलच्या आधारावर ख्रिस्ती धर्माचा सगळा डोलारा उभा राहिला. परंतू येशूचे नेमके म्हणणे काय होते, यावरही मतभेद होत गेले, या प्रत्येक मतभेदासोबत एक नवा ग्रंथ निर्माण होत गेला. या धर्मातही अनेक तट पडले, त्यांनी बायबलमधील काही भागाला मान्यता दिली तर काही भाग वर्ज्य ठरविला. आज ख्रिश्चन धर्मात अनेक पंथ आहेत. हजारोंच्या संख्येने धर्मग्रंथ आहेत.
आता यानंतर पुढे आले महंमद पैगंबर. त्यांनी असे म्हणले की देवाला काय म्हणायचे होते, ते ना ज्यू ना समजले, ना ख्रिश्चनांना समजले. देवाला नेमके काय म्हणायचे आहे, ते मी सांगतो. त्यामुळे त्यांनी ईश्वराने दिलेल्या संदेशातून कुराणाची निर्मिती केली. कुराण हे जगातील असे एकमेव पुस्तक आहे, ज्यातील अक्षरेही मोजली आहे. ज्या पुस्तकात जवळपास १४०० वर्षे एका अक्षराचाही फेरफार झाला नाही असे एकमेव पुस्तक म्हणजे कुराण. आतातरी देवाला नेमके काय म्हणायचे आहे, ते लोकांना कळायला काही हरकत नव्हती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. कुराणातील वचनांना लोक पैगंबरांच्या जीवनात आधार शोधू लागले. त्यातून हदिस म्हणजे पैगंबरांच्या आठवणी सांगणाऱ्या पुस्तकांची निर्मिती झाली. या हदिस शेकडोंच्या घरात आहेत. यामध्येही सर्वात विश्वासाच्या आणि कमी विश्वासाच्या असे प्रकार आहेत. पण कुराण आणि हदिस वाचल्यानंतरही अनेकांच्या मनात अनेक शंका राहिल्याच. मग वेगवेगळ्या धर्मचिंतकांनी या कुराण आणि हदिसवर आपले मत मांडणारे ग्रंथ लिहले. मुस्लिम धर्मातही अनेक पंथ निर्माण झाले. या धर्मातही आता हजारोंनी धर्मग्रंथ आहेत.
ईश्वर एक आहे असे मानणाऱ्या या तीन धर्मांची ही कहाणी आहे. दहा शब्दापासून सुरु झालेला हा प्रवास आता हजारो धर्मग्रंथ, शेकडो कर्मकांडे, अब्जावधी चालीरितींच्या जंजाळात गुरफटला आहे.
आणि अजुनही देवाला नेमके काय म्हणायचे आहे, याचा शोध संपलेला नाही.
( ब्राम्हणांनी मासांहार केव्हा सोडला या मुद्द्यावरून आपण चांगलेच भरकटले आहोत, पण या पुढच्या भागात त्या मुद्द्यावर निश्चितच येऊ. मात्र आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. )