मुंबई : महान्यूज लाईव्ह
वाढदिवस साजरा करण्याची आजच्या तरुणांमधील फॅशन अनेकदा विकृत स्वरुप धारण करते. रात्री १२ वाजता फटाके वाजवणे, तलवारीने केक कापणे, दंगामस्ती, डीजे अशा प्रकारांमुळे असे वाढदिवस लोकांमध्ये बदनाम होऊ लागले आहेत.
मुंबईजवळील अंबरनाथमधील एका वाढदिवसातील मजामस्ती बर्थ डे बॉयच्या इतकी अंगाशी आली की तो स्वत: आगीच्या तडाख्यात सापडून भाजला. आता त्याला रुग्णालयात बरेच दिवस काढावे लागणार आहेत. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मंगळवारी घडलेल्या या घटनेत राहुल नावाच्या या तरुणाच्या मित्रांनी वाढदिवसासाठी अंडी आणि पीठही तयार ठेवले होते. राहुलने केक कापल्यावर त्याच्या एका मित्राने जळती मेणबत्ती त्याच्या तोंडात दिली. एकाने त्याच्या डोक्यावर अंडी फोडली आणि दुसऱ्याने त्याच्या अंगावर पीठ ओतले. पीठ ओतल्याबरोबर मोठा जाळ झाला. बाकीच्या लोकांना काही समजेपर्यंत राहूल ५० टक्क्यांहून जास्त भाजला.
पीठ हे आग पकडू शकते आणि राहूलच्या तोंडात असलेल्या जळत्या मेणबत्तीमुळे पीठाने पेट घेऊन ही आग लागली. आता राहूल रुग्णालयात उपचार घेत असून त्याला बरे होण्यासाठी अजून खुप दिवस रुग्णालयात रहावे लागणार आहे.