लक्ष्मण जगताप, बारामती
महान्यूज लाईव्ह विशेष
‘ जगात स्त्री आणि पुरुष या दोनच जाती असून मानवता हा एकच धर्म आहे.’ असे मानवतावादी विचार मांडणारे जागतिक कीर्तीचे पंडित आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. देशाच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान फार मोठे असल्याने त्यांच्या कार्याला उजाळा देणे एक भारतीय म्हणून सर्वांची जबाबदारी आहे. डॉ.आंबेडकर ,छञपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज , महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस , राजाराम मोहन रॉय , भगतसिंग , राजगुरु, अशा अनेक महान विभूतींनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माझे राष्ट्र या उदात्त भावनेतून राष्ट्राच्या उन्नतीबरोबरच देशातील सर्वसामान्य जनतेसाठी आपले जीवन सर्मपित केले. म्हणून आज स्वातंञ्यानंतर मागे वळून पाहताना या थोर पुरुषांच्या विचारांचा मागोवा घेणे आणि त्यानुसार आपली वाटचाल करणे आपले काम आहे.
डॉ.आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करुन देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता ही मूल्ये आपल्या संविधानाचे महत्त्व अधोरेखित करतात.
अज्ञान हे सर्व समस्यांचे मूळ आहे हा अतिशय महत्त्वाचा विचार बाबासाहेब आपल्याला देतात. बाबासाहेब अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या ज्ञानाची भूक भागविली. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही याविषयी बाबासाहेब भाषणात म्हणतात.
” मुंबईच्या डेव्हलपमेंट चाळीत दहा फूट लांब,दहा फूट रुंद अशा खोलीत बाप,भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करु शकलो, तर मग तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल ? कोणताही मनुष्य सतत दिर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुध्दीमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.” पुणे येथे ११-३-१९३८ रोजी विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना डॉ.आंबेडकरांनी हे विचार मांडले आहेत .
बाबासाहेबांनी त्या काळी मांडलेले विचार आजही किती मौल्यवान आहेत याची प्रचिती येते. आज मुलांना सर्वसुखसोयी अथवा साधने उपलब्ध आहेत. परंतु शिक्षणात अपेक्षित प्रगती अथवा यश मिळत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे जाणीवेचा अभाव. माझ्या आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी मला शिकलेच पाहिजे, ही जाणीव मुलांमध्ये निर्माण होईल त्यावेळी समाजात अनेक विद्यार्थी आत्मविश्वासाच्या बळावर यशवंत किर्तीवंत झालेले पहावयास मिळतील.
बाबासाहेब पुढे आपल्या भाषणात म्हणतात “आत्मविश्वासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. मी जे करीन ते होईल. अर्थात हे सर्व मी आत्मविश्वासावर अवलंबूनच करत असतो.”
बाबासाहेब विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देतात. शिकण्याशिवाय पर्याय नाही हे समजावून देताना ते सांगतात .’ विद्या हे असं धन आहे की त्याची कोणी चोरी करु शकत नाही ‘.
आजच्या मुलांनी शिक्षण घेत असताना बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. कारण बाबासाहेब इंग्लडमध्ये असताना जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यास आठ वर्षे लागतात तो अभ्यास त्यांनी दोन वर्षे तीन महिन्यात पूर्ण केला. यासाठी चोवीस तासातील एकवीस तास बसून अभ्यास करावा लागला आहे. ज्ञानाची भूक इतकी प्रचंड होती की पोटाच्या भूकेचा त्यांना विसर पडत असे.. जागतिक कीर्तीचे विद्वान पंडित म्हणून त्यांचा लौकिक आहे.
विद्या विनयेन शोभते याबाबतीत बाबासाहेब पुढे म्हणतात ” माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तर विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल.”
शिक्षणतज्ज्ञ म्हणून बाबासाहेबांचे विचार कमालीचे प्रभावशाली आहेत. शिक्षणाने माणसाच्या जीवनातील अंधःकार दूर होवून ज्ञानाचा प्रकाश येऊ शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता.परदेशात जाऊन बाबासाहेबांनी अनेक विद्याशाखांचा अभ्यास केला. विविध विषयावर संशोधन केले.अनेक पदव्या संपादन केल्या. एक वेळ तर अशी होती की बाबासाहेबांना पावाच्या तुकड्यावर दिवस काढावे लागत होते. तरी सुद्धा आपल्या शिक्षणापासून विचलित होण्याचा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही. बाबासाहेब खूप जिद्दी होते. मनात आलेली गोष्ट ते कितीही ञास झाला तरी ते साध्य करत.
बाबासाहेबांना पुस्तकांचे व वाचनाचे प्रचंड वेड होते. पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारा दुसरा माणूस नसेल असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. त्यांच्या ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. ख-या अर्थाने बाबासाहेब श्रीमंत होते. माणसांपेक्षा त्यांना पुस्तकांचा सहवास खूप आवडत असे. आज आपल्याला ज्ञानी बनायचे असेल तर बाबासाहेबांसारखे पुस्तकात गुंतून घ्यावे लागेल. आजच्या काळात ज्ञान हीच संपत्ती असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांने ज्ञानी बनण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत.