मुंबई : महान्यूज लाईव्ह
वाढणारे वजन आणि जाडेपणाची समस्या आता जगभर जाणवते आहे. बदललेली जीवनशैली, शारिरिक कष्टांमध्ये आलेली कमी यामुळे ही समस्या वाढतच जाणार आहे. वाढणारे वजन कमी करण्यासाठी जीममध्ये घाम गाळण्यापासून आतड्याचे ऑपरेशन करण्यापर्यंत विविध उपाय लोक करताना दिसतात.
आता मात्र एक साधा उपाय पुढे येत असल्याचे दिसते आहे. पुढील काही काळात ही उपचार पद्धती सर्वसामान्यांसाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील काही शास्त्रज्ञांनी हा उपाय शोधून काढला आहे. यामध्ये तु्म्हाला दर आठवड्याला केवळ एक इंजेक्शन घ्यायचे आहे. हे इंजेक्शन घेतल्यावर तुमची भुक काही प्रमाणात कमी होते. अर्थातच तुम्ही कमी खाता आणि त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो.
सेमाग्लुटाईड हे या इंजेक्शनचे नाव आहे. हे औषध नवीन नाही. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी करण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो.
ब्रिटनमध्ये तब्बल दोन हजार लोकांवर प्रयोग करून संशोधनाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर हे इंजेक्शन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लेख न्यू जर्नल ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्रसिद्ध झाला आहे ब्रिटनमध्ये या इंजेक्शनच्या वापराला आता परवानगी मिळाली आहे.
या चाचणीत सहभागी दोन हजार लोकांपैकी ३२ टक्के लोकांना आपले वजन १५ ते २० किलोने कमी झाल्याचा अनुभव आला आहे. आता हे इंजेक्शन लवकरच जगभरात उपलब्ध होऊ शकेल.