सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत भरभक्कम वाढविण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक जणांना वेगवेगळ्या समित्यांवर काम करण्याची संधी दिली आहे. आता भरणे यांनी दस्तुरखुद्द माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावड्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून बावडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते विजय मारुतराव घोगरे यांची पालकमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शिफारशीवरून नुकतीच तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ही समिती अतिशय महत्वाची समजली जाते. या समितीच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण व रेशनींग विषयीचे प्रश्न सोडविले जातात. तालुक्याचे आमदार हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी अनेक जणांना वेगवेगळ्या समित्यांवर काम करण्याची संधी दिली आहे. मागील आठवड्यात पिंपरी बुद्रुक येथील श्रीकांत बोडके यांची रोजगार हमी योजना समितीवर वर्णी लावली असून पुन्हा अजून एकदा विजय घोगरे यांना तालुकास्तरीय समितीवर संधी देत बावडा परिसराकडे अधिकचे लक्ष देत असल्याचे अधोरेखित केले आहे.
यापुर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश घोगरे हे विद्युत वितरण व सनियंत्रण समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असताना ” बावडा ” गावाला विजय घोगरे यांच्या रूपाने आणखी एक महत्वपूर्ण समिती मिळाली आहे. श्री.घोगरे यांची तालुकास्तरीय समितीवर वर्णी लागल्याचे कळताच बावडा गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी भवन येथे श्री.घोगरे यांचा सन्मान करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतबापू पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,कार्याध्यक्ष अतुल झगडे,युवानेते नवनाथ रूपनवर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन खामगळ,बाभुळगावचे युवा नेते शिवाजी जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.