शिरूर : महान्युज लाइव्ह
मंचर पोलिस स्टेशन हद्दीत मोबाईल दुकाने फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत जयराम लोखंडे ( वय ३७ रा. पारगाव तर्फे अवसरी, ता. आंबेगाव ) यांनी मोबाईल चोरीची फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अशाच प्रकारचे गुन्हे खेड शिक्रापूर या भागात यापूर्वी झाल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला समजले. त्यामुळे सदर गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.त्यानुसार तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरोली फाटा राजगुरुनगर येथे जाऊन सापळा रचून संशयित रीत्या वावरत असलेल्या निखिल विजय पलांडे ( वय २६ रा. मुखई ता. शिरूर ),सचिन आत्माराम मोहिते (वय ३३, रा. मुखई ता. शिरूर ) यांना ताब्यात घेतले. यावेळी वरील दोघांपैकी एकाच्या पाठीवर काळ्या रंगाची मोठी बॅग मिळून आली त्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचे नवीन मोबाईल मिळून आले. त्यांच्याकडे त्या मोबाईल फोन विषयी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हे मोबाईल पारगाव तर्फे अवसरी येथील ओम एंटरप्रायजेस या मोबाईल शॉपी मधून चोरल्याची कबुली दिली.
त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे रुपये ३,०४,७२१ किमतीचे १२३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाईल त्यांनी खेड व शिक्रापूर येथील मोबाईल शॉपीमध्ये मोटार सायकलवर जाऊन चोरल्याची कबुली दिली. यातील काही मोबाईल त्यांनी शिक्रापूर येथील पाबळ चौक, हिवरे रोड येथे राहणारा इसम अमन मुकेश अग्रवाल याला विकले असल्याची कबुली दिली. अमन मुकेश अग्रवाल याला ताब्यात घेऊन उर्वरित मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी खेड, शिक्रापूर भागात चोरी केल्याचे कबूल केले आहे. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे,दिपक साबळे, पोहवा.विक्रम तापकीर, पोहवा.राजू मोमीन, पोहवा.अतुल डेरे, पोहवा. चंद्रकांत जाधव,पो. नाइक संदिप वारे, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय नवले, पो. कॉ.निलेश सुपेकर, पो. कॉ. दगडू वीरकर यांनी केला आहे.