नाशिक : महान्यूज लाईव्ह
नाशिकमध्ये जितेंद्र ईवी या इलेक्ट्रीक स्कुटर बनविणाऱ्या कंपनीतून विक्रीसाठी नेल्या जात असलेल्या २० इलेक्ट्रीक स्कुटर्सना अचानक आग लागली असल्याची घटना समोर आली आहे. केंद्र आणि राज्यसरकार एकीकडे इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना अशा घटनांमुळे इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांच्या मनात भिती निर्माण होत आहे.
या इलेक्ट्रिक स्कुटर्स बनविणाऱ्या कंपनीनेही ही घटना घडल्याचे मान्य केले आहे. असे घडण्यामागील कारणांचा शोध घेतला जात असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. ९ एप्रिलला कंपनीच्या गेटसमोरच ही घटना घडली होती. आगीवर लगेच नियंत्रण आणण्यात आले असल्याचेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मात्र इलेक्ट्रीक स्कुटरला आग लागण्याची ही एकमेव घटना नाही. गेल्या महिन्यात पुण्यामध्ये ओला एस १ प्रो इलेक्ट्रीक स्कुटरला आग लागली होती. याखेरीज ओकिनावा कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कुटरबाबतीतही घडली होती.
जितेंद्र ईव्ही कंपनीने २०२१ – २२ या वर्षात ३७८८ इलेक्ट्रीक दुचाकी विकल्या आहेत. याच वर्षात देशभर एकुण २.३१ लाख इलेक्ट्रीक दुचाकी विकल्या गेल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारही इलेक्ट्रीक वाहनांची विक्री वाढावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे अशा घटनांची त्यांनीही गंभीर दखल घेतलेली आहे.
पेट्रोल डिझेलकडून लोकांना इलेक्ट्रीक वाहनांकडे वळविण्याच्या रस्त्यात अनेक अडथळे अगोदरच आहेत. जर अशा घटना वारंवार घडू लागल्या तर हा रस्ता आणखीनच अवघड होण्याची दाट शक्यता आहे