सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
स्वस्त धान्य दुकानातील गहू तांदूळ किंवा इतर वस्तु काळ्याबाजारात विकणारे रेशन दुकानदार कितीही कारवाया झाले तरी नाव पोलिसांच्या बापाला भितात; ना सरकारच्या बापाला! अनेकदा कारवाया होऊनदेखील काळ्याबाजारात गहू तांदूळ का विकला जातो? याचे कोडे जसे उघडायला तयार नाही, तसेच हा रेशन दुकान चा गोरगरिबांचा गहू तांदूळ अजूनही बाजारात विकणं थांबलेले नाही हे देखील एक गूढच आहे.
इंदापूर तालुक्यातील रेशन दुकानातील तब्बल तीन टन गव्हाची बेकायदेशीर व अवैध साठवणूक करून अपहार करत असताना इंदापूर पोलिसांनी महसूल खात्याने व अन्न पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत या दुकानदारावर कारवाई केली. कारवाईचे स्वागतच आहे; प्रश्न आहे तो हा की, अशा प्रकारची अपहाराची सवय सुटणार कधी?
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 65 पिशव्या आणि तीन टन शंभर किलो गहू पोलिसांनी या कारवाईत पकडला. पुरवठा निरीक्षक संतोष निशीकांत अनगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयुर अशोक चिखले (वय ३२ वर्षे), अतुल सोमनाथ होनराव (वय ४९ वर्षे) व वत्सला भानुदास शिंदे या तिघा विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
या गव्हाची शासनमान्य किंमत 62 हजार रुपये असून या गव्हासह महिंद्रा कंपनी चा ४ लाख रूपये किंमतीचा पिकअप (क्रमांक : एम. एच. ४२ एम ७०३३) पोलिसांनी ताब्यात घेतला. यासंदर्भात पुरवठा निरीक्षक संतोष अनगरे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.