सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : विधानसभेच्या सन 2019 च्या निवडणुकीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला. भरणेंना पराभूत करण्यासाठी घोलप यांनी तत्कालीन भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा उघड-उघड प्रचार केला. आता तालुक्यात बऱ्याच राजकीय घडामोडी होत असताना बाळासाहेब घोलप यांनीही माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची साथ सोडली असून त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे.
हर्षवर्धन पाटलांना हा एक धक्काच मानावा लागेल. घोलप यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन आपल्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. यावेळीअजित पवार यांनी बाळासाहेब घोलपांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेब घोलप यांनी आपल्या सक्रियतेविषयी बोलताना सांगितले की, थोड्याशा गैरसमजातून आम्ही 2019 च्या विधानसभेला दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात प्रचार केला होता.परंतु इथुन पुढे मात्र शरद पवार साहेब, अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेटाने काम करणार आहे.
ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापुर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत आहे. त्यामुळे आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही,आणि खमके नेतृत्व अजित पवार पाठीशी आहेत. म्हणून आम्हीसुद्धा आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अग्रक्रमावर राहणार आहे.
तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे म्हणाले की, लवकरच बाळासाहेब घोलप हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय होत असून त्याचा निश्चितपणे फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. तसेच राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते व पदाधिकारी प्रवेश करणार असून याबाबत लवकरच नावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.