दौंड : महान्यूज लाईव्ह
ओबीसींना आरक्षण हवे असेल तर प्रथम ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. सर्वाच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण हे जातीनिहाय जनगणना नसल्यामुळेच रद्द केले आहे. केंद्र आणि राज्यसरकार एकमेंकाकडे बोट दाखवून दिशाभुल करीत आहेत. विविध राजकीय पक्षात विखुरलेल्या ओबीसी राजकीय नेत्यांनी आणि कार्यकत्यांनी जातीनिहाय जनगणनेसाठी मोठे आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. जनगणनेशिवाय आरक्षण मिळणे अशक्य आहे, असे मत फुले शाहू आंबेडकर चळवळीचे विचारवंत रमेश कुसाळकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, दौंड तालुक्यात दौंड शहरासह पाटस, केडगाव, देऊळगावगाडा,पडवी, माळवाडी आदी ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. दौंड तालुक्यातील पाटस येथे क्रांतीज्योती प्रतिष्ठाण यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक व्याख्यान माला आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांच्या जीवन संघर्षातून बहुजन समाजाने काय प्ररेणा घ्यावी. तसेच माझा जयजयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीकोनातील महत्वाचे काम पुर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावा, या विषयावर फुले शाहु आंबेडकर चळवळीचे विचारवंत रमेश कुसाळकर यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, एका ब्राम्हण मित्राच्या लग्नात झालेल्या अपमानातून महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांतीला सुरवात केली. सत्यशोधक समाज तयार करून सामाजिक कार्याची सुरुवात केली. याच सत्यशोधक समाजाचा वारसा पुढे राजर्षी शाहू महाराज आणि घटनाकार डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवला.
महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शोधून त्यांची दहा दिवस जयंती साजरी केली. शिवाजी महाराज यांचा काळ शेतकऱ्यांसाठी इतिहासातील एक सुर्वण काळ होता. मात्र सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
या आत्महत्या रोखण्याचे तंत्र महात्मा फुले यांनी १८६९ साली सांगतिले आहे. शेतकऱ्यांचा आसुड या ग्रंथात शेतकऱ्यांच्या समस्या मुळ आहे. राजकीय नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी हा ग्रंथ वाचला पाहिजे.महात्मा फुले यांनी त्या काळात मनुवादी सनातनी व्यवस्थेवर प्रहार केला. गुलामिगिरी या ग्रंथात त्यांनी परखड लिखान केले. जो गुलामगिरी वाचेल तो कधीच मानसिक आणि शारीरीक गुलाम होणार नाही,बहुजन समाजासाठी महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.डॅा.बाबासाहेब आंबडेकर यासह सर्व महामानवांनी मोठा त्याग केला आहे.त्यांचे विचार जगाने मान्य केले आहे.मात्र आजही काही मनुवादी विचारांचे बहुजन समाज त्यांच्या विचारावर चालायला तयार नाही. पुढची पिढी वाचवयाची असेल तर आजच्या पिढीने सामाजिक संघर्ष करण्याची गरज आहे.सध्या बहुजन समाजाला पुन्हा एकदा गुलाम बनविण्याचे षढंयंत्र सुरू आहे. शिक्षण महाग झाले आहे. शैक्षणिक दरवाजे बंद झाले तर येणाऱ्या पिढ्यांना शिक्षण मिळणार नाही. अशी भिती कुसाळकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, याप्रसंगी सरपंच अवंतिका शितोळे,माजी सरपंच योगेंद्र शितोळे,दौड पंचायत समितीचे उपसभापती विकास कदम,साहेबराव वाबळे,जयंत पाटील,तानाजी केकाण, शंकर पवार गोरख फुलारी, संभाजी देशमुख,प्रकाश भागवत तसेच क्रांतीज्योती प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.