राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे आखाड्यात पार पडलेल्या श्री भानोबा चषक २०२२ च्या शेवटच्या मानाच्या कुस्तीत राहु येथील मल्ल तुषार डुबे याने कुर्डवाडीचा मल्ल सागर मोटे याला चितपट करीत चांदीची गदा पटकवली. ग्रामस्थांच्या वतीने विजेता मल्ल तुषार डुबेला चांदीची गदा आणि रोख रक्कम ५१ हजार रूपयांचे बक्षिस देवून सन्मानित केले.अत्यंत थरारक आणि रोमांचक कुस्तीचा डाव – प्रतिडाव यावेळी या आखाड्यात उपस्थित कुस्ती शौकीनांना पाहायला मिळाला. माजी आमदार रमेश थोरात आणि पाटस पोलीस चौकीचे सहायय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनीही या आखाड्यात कुस्त्यांचा रोमाचंक आणि थरारक खेळ पाहण्याचा आनंद घेतला.
कुसेगाव येथील श्री भानोबा तरुण मंडळाने रविवारी ( दि.१० ) भानोबा चषक २०२२ चे कुस्त्याच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले होते. या आखाड्यात पुणे जिल्हासह इतर जिल्हयातील नामांकीत मल्लांनी हजेरी लावली होती. माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते मल्लांच्या कुस्ती लावुन शुभारंभ करण्यात आला. लहान वयोगटातील मल्लांच्या कुस्त्या प्रथम घेण्यात आल्या. यावेळी लहान वयोगटातील मल्लांनी दंड थोपटून अतिशय सुंदर असे डाव व प्रतिडाव करीत आखाडयात आपला कुस्त्यांचा लाल मातीतील मैदानी खेळ दाखविला. यावेळी या लहान मल्लांना प्रोत्साहनपर आयोजकांनी बक्षिसे देवून सन्मान केला. या कुस्ती आखाड्यात ५२ व मुलींच्या ४ कुस्त्या झाल्या. यामध्ये शेवटची कुस्ती राहुचा मल्ल तुषार डुबे व कुर्डवाडीचा मल्ल सागर मोटे यांच्यात थरारक कुस्ती झाली. मल्ल तुषार डुबे यांनी सागर मोटेला चितपट करीत विजय मिळवला, उद्योजक मोहन शितोळे यांनी डुबे यास मानाची चांदीची गदा आणि रोख ५१ हजार रूपये इनाम देवून सन्मना केला तर पाटसचे माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी केकाण यांनीही तिसऱ्या कुस्तीला इनाम देऊन विजेत्या मल्लाचा सन्मान केला.
या आखाडयातील मैदानी कुस्त्यांचा खेळ पाहण्यासाठी कुसेगावसह दौंड तालुक्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या आखाडा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विनोद रुपनवर, प्रमोद शितोळे,गणेश शितोळे, नितीन शितोळे यांनी परिश्रम घेतले. श्री भानोबा तरुण मंडळ, कुसेगाव यांनी या आखाड्याचे नियोजन केले होते. या मैदानात पंच म्हणुन नॅशनल कुस्ती चॅम्पियन पैलवान संजय वाघमोडे,पैलवान महेश शितोळे,पैलवान सचिन आव्हाळे,पैलवान सोमनाथ हारनवळ यांनी काम पाहिले. तर निवेदक म्हणून पैलवान सागर चौधरी,पैलवान अक्षय मुळूक, उत्तम रुपनवर,हनुमंत शितोळे आदींनी काम पाहिले.