राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात मागील दोन दिवसांपासून अतिरिक्त भारनियम सुरू झाल्याने सातत्याने केव्हाही वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. या प्रकारामुळे ऎन उन्हाळ्यात नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तीव्र उष्णता आणि त्यातच वीज पुरवठा खंडीत होत असल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. वीज ग्राहकांना पुर्व कल्पना न देता महावितरण कंपनीने अतिरिक्त भारनियम सुरू केले आहे. राज्यसरकारच्या आदेशानुसार हे भारनियम केले जात असल्याचे महावितण वीज कंपनीचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे राज्यसरकार आणि महावितरण कंपनीवर दौंड तालुक्यातील गावागावातील नागरीक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
महावितरण कंपनीने मागील काही महिन्यापुर्वी थकीत कृषी पंपाची वीज बिले भरण्यासाठी रोहीत्रे बंद करून वीज पुरवठा खंडीत केला होता. शेतकऱ्यांनी थकीत वीज बिले भरून आपला वीज पुरवठा सुरळीत केला. त्यानंतर महावितरण कंपनीने आपला मोर्चा घरगूती आणि व्यापारी थकीत वीज ग्राहकांकडे वळविला. वीज मिटर जप्त करून थकीत बिलांची वसुली महावितरण कंपनीने केली. मार्च महिन्यात महावितरण कंपनीने थकीत वीज बिलांची वसुली केली. या वसुलीनंतर एप्रिल महिन्याच्या
पहिल्याच आठवड्यात महावितरण कंपनीने ग्राहकांना कोणतेही पुर्व कल्पना न देता अचानक
वीज पुरवठा खंडीत केला. याचे कारण विचारले तर भारनियम सुरू झाले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दिवसा व रात्रीच्या सुमारास कधीही आणि कोणत्यावेळी हे अतिरिक्त भारनियम केले जात आहे. पाच – पाच तास वीज पुरवठा बंद करून हे भारनियम सूरू आहे.
वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांचा मेसेज आला की वीज पुरवठा बंद करून भारनियम सुरू आणि पुन्हा मेसेज आला की भारनियम बंद आणि वीज पुरवठा चालू असा प्रकार सध्या मागील दोन दिवसांपासून सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात अंधारात रात्र काढावी लागल आहे. तसेच वीज पुरवठा खंडीत होत असल्याने या भारनियमनाचा मोठा फटका विजेवर सुरू असलेल्या छोट्या मोठ्या उद्योगांना होत आहे. वरिष्ठ अधिकारी सांगतील तसे आम्हाला करावे लागते, नागरीकांना त्रास होतोय मात्र आमचा नायईलाज आहे, असे दौंड महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी सांगत आहेत.
दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात हे भारनियम सुरू झाले आहे. कारण काय तर थकीत वीज बिले भरली नाहीत म्हणून केंद्र सरकारने राज्याचा वीज पुरवठा रोखला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधारात आहे. केंद्रसरकार आणि राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सध्या नियमीत वीज बीले भरणाऱ्या ग्राहकांचे मरण झाले आहे. तालुक्यातील कंपन्यांना भारनियमन नाही का ? महावितरण कंपनीने सुरू केलेले हे अतिरिक्त भारनियमन सध्या तालुक्यातील औद्योगिक वसाहती मधील कंपन्या लागु नाही का ? फक्त जनतेवरच हे भारनियमन सुरू आहे का प्रश्न उपस्थित केला जात आहे. कंपन्यांना मात्र चोवीस तास वीज पुरवठा सुरू आहे. वीज पुरवठा खंडीत करुन तो कंपन्यांकडे वळविला जात आहे असा आरोप नागरीक करीत आहेत.