दौंड : महान्युज लाईव्ह
वाहन चालकांना अडवून धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करणा-या अट्टल चोर सम्या वंजारीला यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. यवत, भोर आणि पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या तब्बल १३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे करुन तो पोलीसांच्या हाती लागत नव्हता. मात्र अखेर त्याची गाठ यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याशी पडली. यवत पोलीसांनी बुधवारी त्याच्या मुसक्या आवळल्या.
दौंड तालुक्यातील नानगाव येथील समीर सुरेश वंजारी याने १० जानेवारी २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाखारी हद्दीतील हॉटेल समाधान येथे जेवण करण्यासाठी बालाजी जळबा कोंडेवार ( रा. खालापूर ) यांनी गाडी थांबवली असता तीन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीत चढुन कोयत्याचा धाक दाखवुन, उलटा कोयता पाठीवर मारून, हाताने मारहाण करून एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम ४ हजार ८०० रुपये लुटून मोटार सायकलवरून पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापुर बाजुकडे पसार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी यवत पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. तेंव्हा पासून या गुन्ह्यातील आरोपी फरार होते. यापैकी समीर वंजारीला यवत पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार गुरू गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, रविंद्र गोसावी, पोलीस शिपाई तात्या करे, ननवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.