माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
कासुर्डी गु.मा. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या कार्यालयाकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील महिला सरपंच सारिका शांताराम मालुसरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे भोर तालुक्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कासुर्डीमध्ये केलेल्या विकासकामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सारिका मालुसरे यांचे कौतुक केले होते.
सारिका मालुसरे ह्या २०१७ मध्ये ग्रामपंचायती निवडणुकीत जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत. कासुर्डी गुंमा ( ता. भोर ) येथील ग्रामपंचायतीचे संबंधित ग्रामसेवक आणि भोर पंचायत समिती कार्यालयाकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आज दि. ६ रोजी बुधवारी गटविकास अधिकारी व प्रभारी सभापती यांच्या नावे भोर पंचायत समिती कार्यालयात राजीनाम्याचे पत्र दिले आहे. संबधित ग्रामसेवक यांच्या पाठीशी पक्षातीलच काही मंडळी असल्याचे बोलले जात असून पक्षातील अंतर्गत बंडाळीचं फटका महिला सरपंच मालुसरे यांना सोसावा लागत असून खासदार सुळे याकडे लक्ष देणार का ? अशीही चर्चा सुरु आहे.
सरपंच सारिका मालुसरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले, कि, सरपंच म्हणून कारभार करत असताना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक विकासकामांमध्ये अडचणी व अडथळे निर्माण केले जातात. तसेच झालेल्या कामाचे बिल अदा न करणे, कोणतेही कागदपत्रांची पोच न देणे, तसेच वारंवार अपमानास्पद वागणूक देणे आदी प्रकार माझ्याबाबत वारंवार घडत गेले. याबाबत देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील कोणतीही दखल घेतली गेली नाही. नाइलाजास्तव राजीनामा द्यावा लागला असल्याचे मालुसरे यांनी सांगितले.