शिरुर : महान्युज लाइव्ह
न्हावरे (ता. शिरूर) येथील घोडगंगा कारखान्याजवळ टेंपो व कोंबड्या पळवुन नेणाऱ्या पाच जणांना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ६ मार्च रोजी न्हावरे , ता. शिरूर येथील घोडगंगा कारखान्याचे जवळ ड्रायव्हर पंडित उर्फ राम रामसरण सवारे हा त्याचे ताब्यातील टेम्पोमध्ये १३६० कोंबडया घेऊन जात असताना त्यास ५ अनोळखी व्यक्तींनी सेंट्रो कारमधून येऊन मारहाण करून टेम्पो व त्यातील कोंबडया चोरून नेल्या होत्या. परंतु त्याबाबत कोंबडी व्यावसायिक मालक महंमद आलम अब्रार सिद्दीकी यांनी ड्रायव्हर पंडीत उर्फ राम रामसरण सवारे याचेवर संशय घेऊन त्यानेच अपहार करून कोंबड्या इतर व्यावसायिकास विकल्या असाव्यात असा संशय घेतला होता आणि त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता.
परंतु सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे तसेच पोल्ट्री व्यवसायिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक डॉ.श्री.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते व उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सुचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहा.फौज. तुषार पंधारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीन, अजित भुजबळ, पो.ना.मंगेश थिगळे, पो.कॉ.योगेश नागरगोजे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा भानुदास उर्फ पप्पु बबन बोडरे, रा. रावडेवाडी, ता. शिरूर, याने त्याचे साथिदारांसह मिळून केला आहे. त्याअनुशंगाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर व गोपनीय माहितीचे आधारे भानुदास उर्फ पप्पु बबन बोडरे, रा. रावडेवाडी, ता. शिरूर, यास हिवरे कुंभार गावातून जाधव वस्तीकडे जाणाऱ्या रोडलगत गावच्या परिसरातून ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथिदरांसह केला असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यातील आरोपी यशवंत अनिल वेताळ, वय 23 वर्षे, रा. वरूडे, सागर अरूण टेमगिरे, वय 23 वर्षे, रा. पारोडी, प्रमोद दिलीप चव्हाण, वय 25 वर्षे, रा. निमगाव म्हाळुंगी, केतन दत्तात्रय नरवडे, वय 20 वर्षे, खंडाळा यांना ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी शिरूर तालुक्यातील आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे आदेश अन् स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विद्युत पंप चोरणाऱ्या आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली होती. तर वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या चोऱ्या देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न अन् स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कामगिरी यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. आजच मावळ तालुक्यातील अशाच कोंबड्याच्या टेम्पो चोरून नेण्याचा गु्न्हा पोलिसांनी उघड केला आहे. त्याचप्रकारचा शिरूर येथील गुन्हाही आता उघडकीस आणला गेला आहे. एकाच दिवशी हे दोन्ही एकाच प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याची पुणे ग्रामीण गुन्हे शोध शाखेची कामगिरी कौतुकास्पद आहे.