मुंबई : महान्यूज लाईव्ह
भारताचा शेजारी श्रीलंका सध्या अस्वस्थ आहे. आर्थिक अराजकतेकडून आता राजकीय अराजकतेकडे देश चालला आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. लोक रस्त्यावर उतरले आहे. त्यांचा राग श्रीलंकेची सगळी सत्ता ज्यांनी आपल्या हातात ठेवली आहे, त्या राजपक्षे घराण्यावर आहे. पण आता राजपक्षेंच्या कुटुंबातील लोकच देश सोडून पळत असल्याच्या बातम्या येत आहेत.
राजपक्षेच्या कुटुंबातील सात जणांच्या हातात देशातील सगळी महत्वाची पदे होती. राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री अशी सगळी पदे त्यांच्याच घरात होती. त्यामुळे आता निर्माण झालेल्या परिस्थितीला लोक पुर्णपणे राजपक्षे कुटुंबालाच जबाबदार धरत आहेत. त्यामुळे आता लोकांच्या प्रक्षोभाच्या भीतीने या कुटुंबातील सदस्य देश सोडत आहेत. राजपक्षे यांचा मुलगा नमल राजपक्षे हा सरकारमध्ये मंत्री आहे. त्याची पत्नी लमिनी राजपक्षे देश सोडून गेली आहे. तसेच राजपक्षे परिवारातील ९ जण श्रीलंका सोडून गुप्त ठिकाणी गेले असल्याचे म्हणले आहे. काल रविवारी ३ एप्रिलला पहाटेच या लोकांनी देश सोडला आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या इतर दोन सुनाही देश सोडून गेल्या आहेत की नाही याबाबत अफवा उठत आहेत.
श्रीलंकेमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती अतीगंभीर होते आहे. भारत एक शेजारी म्हणून जमेल तेवढी मदत करतो आहे. पण श्रीलंकेतील राजकीय नेतृत्वाने ही परिस्थिती स्वत:च्या हाताने ओढवून घेतली आहे हे मात्र नक्की.