शिरूर : महान्युज लाइव्ह
नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.आरोपींकडून तब्बल ८लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईश्वर दिलीप डेरे ( वय ३० रा.डेरेमळा नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे ) यांनी डेरेमळा येथील कॅनॉल वर शेतीला पाणी देण्यासाठी बसवलेली मोटार कोणीतरी चोरून नेली असल्याबाबत फिर्याद दिली आहे तसेच इतर दोन शेतकऱ्यांच्या देखील मोटारी चोरीस गेल्याचे समजले होते. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे खेड जुन्नर विभागात काम करणाऱ्या पथकाने सदर गुन्ह्याचा व आरोपींचा कसून शोध सुरू केला. अनेक भागातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शुभम तोत्रे व भूषण पवार हे काहीएक कामधंदा करत नसून मोटारी विक्री करण्यासाठी नारायणगाव एस टी स्टँड येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन तीन संशयित ताब्यात घेतले. शुभम संदीप पवार ( वय २२ वर्ष, रा.पाटेखैरे मळा, नारायणगाव ),शुभम सुभाष तोत्रे ( वय १८, रा. मंचर ता. आंबेगाव जि पुणे ), विकी संतोष लोखंडे ( वय २० रा. वैद्यवाडी, नारायणगाव ता. जुन्नर ) या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सदर गुन्ह्यासंबधी अधिक विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या एकूण नऊ मोटारी व केबलसह गुन्ह्यात वापरलेली एक पिकअप, एक टाटा इंडिका, एक टाटा इंडिगो अशी तीन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर,
पो.हवा.राजू मोमीन, संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले
पो.कॉ.निलेश सुपेकर,पोना दिनेश साबळे( नारायणगाव पोस्टे ), मुकुंद कदम, दगडू वीरकर यांच्या पथकाने केला आहे.