मुंबई : महान्यूज लाईव्ह
गुरुवारी उत्तर प्रदेशातील एका शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेने जे प्रसंगावधान दाखवले, त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचले. या महिलेच्या बुद्धीमत्तेचे आणि तिने दाखविलेल्या समयसुचकतेचे कौतुक देशभरात होत आहे.
घटना गुरुवारी सकाळी आठ वाजताची आहे. उत्तर प्रदेशातील गुलारिया गावातील राहणारी ओमवती आपल्या शेताकडे जात होती. शेताकडे जात असताना रेल्वेचा रुळ ओलांडताना तिला अचानक लक्षात आले की रुळ तुटलेला आहे. त्याचवेळी एटा – जलेसर – तुंडला पॅसेंजर एटावरून तुंडलाकडे त्याच रुळावरुन जाणार होती.
ओमवतीकडे फारच थोडा वेळ होता. तिच्या अंगावर लाल रंगाची साडी होती. लाल रंग हा धोक्याचे लक्षण आहे हे तिला माहित होते. आणि लाल झेंडा दाखविल्याने रेल्वे थांबते हे देखील तिला माहित होते. तिने आपल्या अंगावरच्या लाल रंगाच्या साडीचाच झेंडा बनविला. सोबतच्या मुलींच्या साह्याने लाकडाचा आधार देऊन तो रेल्वे ट्रॅकवर उभा केला.
रेल्वे पायलटने तो इशारा समजून रेल्वे थांबविली. पायलटने ओमवतीला रेल्वे का थांबवली असे विचारले असता तिने तुटलेला रुळ दाखवला. त्यानंतर रुळ दुरुस्त करण्यासाठी टीम बोलावण्यात आली. रुळ दुरुस्त झाल्यावर अर्ध्या तासाने रेल्वे पुन्हा मार्गस्थ झाली.
ओमवतीच्या या धाडसाचे आणि समजसूचकतेचे सोशल मिडियावर कौतुक होत आहे. तिला रेल्वेकडून सन्मानित करण्यात यावे, तसेच तिच्या धाडसाची कहाणी देशभरातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशीही मागणी करण्यात येत आहे.